बदलत्या हवामानामुळे प्रादुर्भाव कधीही वाढण्याची शक्यता; खबरदारी घेण्याचे आवाहन
पुणे – मागील तीन आठवड्यांपासून शहरासह जिल्ह्यातील स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचे दिसून येते. मात्र, सततच्या बदलत्या वातावरणामुळे हा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी. सध्याच्या सण-उत्सवामुळे सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे, विशेषत: आजारी व्यक्तींनी जाऊच नये. नाका-तोंडाला रूमाल बांधावा आणि सर्दी, ताप, खोकला असल्यास तत्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
मागील तीन महिन्यांत झालेल्या जोरदार पावसामुळे हवामानात लक्षणीय बदल झाले. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात स्वाइन फ्लूसह डेंग्यू, चिकुणगुनिया, मलेरिया या आजारांनी थैमान घातले आहे. दिवसाआड 2 ते 3 रुग्ण स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे अतिदक्षता विभाग आणि वॉर्डमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक वाढली.
दरम्यान, ऑगस्टअखेरीस पावसाने उघडीप दिली आणि उन्हाचा चटका वाढला. त्यामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भावही कमी झाला होता. सप्टेंबरमध्ये पुन्हा पाऊस झाला, तसेच ढगाळ वातावरण आणि रात्री हवेतील गारवा यामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली.
दरम्यान, मागील पंधरा दिवसांपासून ऊन आणि पाऊस यांचा लपंडाव सुरू असून, हवामानातही सतत बदल होत आहे. मात्र, स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढलेला दिसत नाही. गेल्या आठ दिवसांत एकही स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळला नाही. मात्र, सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असलेल्या रुग्णाला टॅमीफ्लूचे औषध देऊन खबरदारी घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.
10 महिन्यांत 172 रुग्ण
दोन दिवसांत दिवसभरात साडेचार हजार व्यक्तींची स्वाइन फ्लू तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 114 संशयित व्यक्ती आढळून आले असून, त्यांना टॅमीफ्लू देण्यात आले आहे. तर स्वाइन फ्लूची लागण झालेल्या 2 व्यक्तींवर खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. दरम्यान, दि.1 जानेवारी ते 27 ऑक्टोबरपर्यंत शहरात स्वाइन फ्लूचे 172 रुग्ण आढळून आले आहे. तर तब्बल 15 हजार संशयित व्यक्तींना औषधोपचार देण्यात आले आहे.