शिक्षक भरतीची प्रलंबित प्रकरणे मार्गी लागणार

डावललेल्या 2 हजार 375 उमेदवारांकडून शिक्षण आयुक्‍तांकडे तक्रार अर्ज दाखल

पुणे – पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात आलेल्या शिक्षक भरतीत डावललेल्या 2 हजार 375 उमेदवारांनी शिक्षण आयुक्त कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांची तपासणी करून भरतीची प्रलंबित प्रकरणे नोव्हेंबरमध्ये मार्गी लावण्यात येणार आहेत. यामुळे आता भरती प्रक्रियेस वेग येणार आहे.

राज्यात 12 हजार शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याची घोषणा शासनाकडून करण्यात आली होती. यासाठी 1 लाख 24 हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यातील 87 हजार उमेदवारांनी प्रोफाईल अपडेट केले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील 9 हजार 128 शिक्षकांच्या पदांची भरती मुलाखतीशिवाय करण्याचे नियोजन करून त्याबाबतची निवड यादीची पोर्टलवर जाहीर करण्यात आली होती. यातील 5 हजार 822 उमेदवारांची थेट निवड झाली. माजी सैनिक, उर्दू माध्यम यासह इतर आरक्षणातील उमेदवार न मिळाल्यामुळे 3 हजार 258 जागा शिल्लकच राहिल्या आहेत. या जागा कन्व्हर्ट करण्यात येणार आहेत. मात्र, ही कार्यवाही शासनाच्या आदेशाप्रमाणेच होणार आहे.

शिक्षक भरतीच्या निवड यादीत पात्र असतानाही स्थान न मिळाल्याने संतप्त झालेल्या उमेदवारांनी शिक्षण आयुक्त कार्यालयात तक्रार अर्ज करण्याचा धडाका लावला होता. यात सुमारे 5 हजार अर्ज दाखल झाले होते. मात्र यात 50 टक्‍के अर्ज हे दुबार असल्याचे आढळून आले आहे. यातील पात्र अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे भरती प्रक्रियेची काही कामे मंदावली होती. आता, मात्र ही कामे वेगाने पूर्ण होणार हे स्पष्ट आहे.

खास अधिकाऱ्यांचे पथक कार्यरत
भरती प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासाठी काही खास अधिकाऱ्यांचे पथक ही कार्यरत ठेवण्यात आले आहे. या अधिकाऱ्यांच्या नियमित बैठका घेऊन त्यांना महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती शिक्षण आयुक्‍त विशाल सोळंकी यांनी दिली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here