निवडणुकांचा हंगाम संपताच प्रशासनाचे नियोजन सुरू
पुणे – गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेला आधी लोकसभेचा आणि नंतर विधानसभेच्या निवडणुकीचा हंगाम संपताच पालिका प्रशासनाने शहरातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाईकडे आपला मोर्चा वळवला आहे.
प्रामुख्याने महापालिका हद्दीत समाविष्ट 11 गावांसह, शहरातील पाच ते सहा मजली उंच इमारतींवर पालिकेकडून कारवाई हाती घेतली जाणार आहे. त्यासाठी पालिकेकडून “हाय रिच जॉ क्रशर क्रेन’ भाडेकराराने घेण्यात येणार असून त्याची निविदा प्रक्रियाही पूर्ण झालेली आहे. निवडणुकांच्या तोंडावर या कारवाईस लोकप्रतिनिधींकडून मोठ्या प्रमाणात विरोध केला जात होता. मात्र, आता निवडणुका तसेच पावसाळा संपल्याने पालिकेकडून या कारवाईचे नियोजन सुरू असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
शहरात समाविष्ट 11 गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे आहेत. त्याचा परिणाम या गावांच्या विकास आराखड्यावर होणार आहे. त्यातच, शहराच्या जुन्या हद्दीलगतही अनधिकृत बांधकामांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढलेली आहे. तर, न्यायालयाकडूनही अनेकदा या प्रकरणी महापालिकेची कान उघडणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे पालिकेकडून गेल्या सात ते आठ महिन्यांपासून या बांधकामांवरील कारवाईचे नियोजन सुरू आहे. मात्र, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर या कारवाईस लोकप्रतिनिधींकडून तीव्र विरोध केला जात होता. मात्र, आता निवडणुकांचा हंगाम संपल्याने पालिकेने पुन्हा या कारवाईकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे.
उंच इमारतींवर होणार कारवाई
महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या यंत्रसामग्रीच्या माध्यमातून पालिका केवळ तीन ते सहा मीटर उंचीच्या (जास्तीत जास्त दोन मजले) इमारतीवरच सक्षमपणे कारवाई करता येते. त्यामुळे पालिकेने त्यापेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर कारवाई करण्यासाठी “हाय रिच जॉ क्रशर क्रेन’ मागविल्या आहेत. त्याद्वारे पाच ते सहा मजली उंच असलेल्या इमारतींवर कारवाई करणे शक्य होणार आहे. प्रामुख्याने 11 गावांमध्ये अशा उंच इमारती असून त्या ठिकाणी महापालिकेस या क्रेनचा कारवाईसाठी मोठा उपयोग होणार आहे.