मुंबई : निवडणुकीत एका मतालाही प्रचंड महत्व असल्याचे नेहमी म्हटले जाते. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराच्या दृष्टीने प्रत्येक मताची राजकीय किंमत मोठी असते. मात्र, अनेक उमेदवार स्वत:लाच मतदान करू न शकल्याचे चित्र विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी झालेल्या मतदानावेळी पाहावयास मिळाले.
स्वत:ला मतदान करण्यापासून वंचित राहाव्या लागलेल्या उमेदवारांमध्ये राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचाही समावेश आहे. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती, कॉंग्रेस नेते सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांचे बंधू अमल हेसुद्धा स्वत:साठी मतदान करू शकले नाहीत.
चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. मात्र, ते पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत. भुजबळ यांची मतदार म्हणून नाशिक शहरात नावनोंदणी झाली आहे. मात्र, ते येवल्यातून निवडणूक लढवत आहेत. ते सोमवारी मतदारसंघात असल्याने मतदानच करू शकले नाहीत. स्वत: निवडणूक रिंगणात उतरणारे ठाकरे कुटूंबातील पहिलेच सदस्य ठरलेले आदित्य यांनी वरळीमधून दंड थोपटले आहेत. मात्र, मतदार म्हणून त्यांना वांद्रे पूर्व मतदारंसघात मतदान करावे लागले.
सोलापूर मध्य मतदारसंघातून प्रणिती निवडणूक लढवत आहेत. मात्र, त्यांचे मतदान सोलापूर दक्षिण मतदारसंघात आहे. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून ऋतुराज आणि अमल एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. मात्र, त्या दोन्ही उमेदवारांची मतदार म्हणून नावनोंदणी वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये आहे.