स्ट्रॉंग रूम व मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवा

निवडणूक अधिकाऱ्यांकडे कॉंग्रेसची मागणी

मुंबई : विधानसभा निवडणूकीसाठी सोमवारी मतदान झाल्यानंतर उमेदवारांचे भवितव्य “ईव्हीएम’मध्ये बंदिस्त झाले आहे. मतमोजणीला आणखी दोन दिवस असल्याने या दरम्यान “ईव्हिएम’ मशीन्स हॅकिंग होण्याची भीती कॉंग्रेसला आहे. त्यामुळे ईव्हीएम मशीन्स ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे. दरम्यान, स्ट्रॉंगरूम परिसरात जॅमर बसविण्याची गरज नसल्याचे मत निवडणूक अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे.

सोमवारी राज्यातील 288 मतदारसंघात विधानसभेसाठी मतदान झाले. मतदानानंतर संबंधित मतदारसंघातील स्ट्रॉंगरूममध्ये ईव्हिएम मशिन कडेकोट पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात येतात. स्ट्रॉगरूम व मतमोजणी परिसरात कोणालाही प्रवेश दिला जात नाही. संपूर्ण परिसरावर सीसीटीव्हीचा वॉच ठेवला जातो. परंतु, मतदानानंतर एक्‍झिटपोलने राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार असल्याचा कौल दिला आहे. त्यामुळे राज्यातल्या मतमोजणी केंद्रात ठेवण्यात आलेली ईव्हीएम मशिन्स हॅक होण्याची भीती कॉंग्रेसने व्यक्त केली आहे.

स्ट्रॉंगरूम बाहेर तीन पदरी सुरक्षा

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पाठवलेल्या पत्रासंदर्भात राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ईव्हिएम मशीन ठेवलेल्या ठिकाणी जॅमर लावण्याची गरज नाही. राज्यातल्या मतमोजणी केंद्रांमधील स्ट्रॉंग रुममध्ये ईव्हीएम मशिन्स अतिशय कडेकोड बंदोबस्तात ठेवण्यात आल्या आहेत. शिवाय ईव्हीएम मशिन अतिशय फूलप्रुफ आहेत. त्यामुळे हॅंकीग होऊच शकत नाही. स्ट्रॉंगरुमच्या बाहेर तीन पदरी (तीन लेअर) सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. पहिल्या वर्तुळात सेंट्रल रिझव्रह पोलिस, दुसऱ्या वर्तुळात राज्य राखीव पोलिस दल व तिसऱ्या वर्तुळात स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त अशा तीन लेअरमध्ये सुरक्षा व्यवस्था असते, असेही शिंदे यांनी सांगितले.

यासंदर्भात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. ईव्हीएम मशीन टॅंपरींग होऊ शकते अशी जनभावना असल्याने ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवावेत अशी कॉंग्रेसने केली आहे. प्रत्येक फेरीच्या मतांची मोजणी झाल्यानंतर मतांची आकडेवारी तात्काळ जाहीर करावी व त्यानंतरच पुढच्या फेरीची मोजणी करावी. व्हीहीपॅटच्या मोजणीसाठी मतदान यंत्र निवडीची मुभा उमेदवारांना द्यावी. तसेच कोणत्याही मतदान यंत्राबाबात शंका निर्माण झाल्यास त्या मतदान यंत्रातील मतांची मोजणी सलग चारवेळा करण्यात यावी, आणि 50 टक्के व्हीव्हीपॅटची मोजणी करावी अशी मागणीही कॉंग्रेसने केली आहे.

चौकट

Leave A Reply

Your email address will not be published.