वॉशिंग्टन- ई-सिगरेटच्या वाढत्या विळख्याने अमेरिकेत आतापर्यंत 1080 लोकांच्या फुफ्फुसात जखमा झाल्या असून 18 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती अमेरिकी आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेचे संचालक रॉबर्ट रेडफील्ड यांनी म्हटले आहे की, ई-सिगरेटमुळे होणाऱ्या घातक परिणामातील हे हिमनगाचे केवळ टोक आहे. अमेरिकेतील लोकांमध्ये या सिगरेटने व्हेपिंग करण्याचे प्रमाण वाढले असून गेल्या आठवड्यापासून 275 नवीन रुग्ण दाखल झाले आहेत. गेल्या दोन आठवड्यात ई-सिगरेटच्या व्हेपिंगने आजारी पडलेल्या व्यक्तींचे प्रमाण वाढले आहे.
एकूण 578 रुग्णांची माहिती घेतली असता त्यात असे दिसून आले की, 78 टक्के लोकांनी टेट्राहायड्रोकॅनाबिनॉल (टीएचसी) या पदार्थाचा वापर निकोटिनसह किंवा निकोटिनशिवाय केला. 17 टक्के लोकांनी निकोटिनयुक्त उत्पादनांचा वापर केला होता. टीएचसी हा सायकोऍक्टिव्ह रसायनाचा मारिजुआना सारखा प्रकार आहे. यात 80 टक्के रुग्ण पस्तीशीखालील असून 70 टक्के रुग्ण हे पुरुष आहेत.
दरम्यान, विशिष्ट ई-सिगरेटवर बंदी घालण्याची घोषणा अध्यक्ष ट्रम्प यांनी नुकतीच केली आहे. भारतातही सर्व प्रकारच्या ई-सिगरेट्सवर बंदी आली आहे.