शांतता प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची व्यक्त केली इच्छा
इस्लामाबाद – तालिबानच्या एका वरीष्ठ शिष्टमंडळाने आज पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रानखान यांची भेट घेतली. अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चेची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची आमची इच्छा आहे असे या शिष्टमंडळाने पाकिस्तानी पंतप्रधानांना सांगितल्याचे वृत्त आहे. अमेरिकेने तालिबानशी चर्चा प्रक्रिया पुर्ण थांबवल्याने तालिबानने आता नरमाईची भूमिका घेत पुन्हा चर्चेची इच्छा व्यक्त केली आहे.
तालिबानचे हे शिष्टमंडळ 12 जणांचे होते. तालिबानच्या शिष्टमंडळाने पाकिस्तानच्या पंतप्रधानांची अधिकृतपणे भेट घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुल्ला अब्दुल घनी बरादर यांनी या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. यावेळी शिष्टमंडळाशी बोलताना इम्रान खान यांनीही पाकिस्तानात शांतता प्रस्थापित होणे ही काळाची गरज असल्याचे म्हटले आहे. पाक लष्कराचे प्रमुख कमर जावेद बाजवा हेही यावेळी उपस्थित होते.
या शिष्टमंडळाने काल पाकचे विदेश मंत्री शाह मेहमुद कुरेशी यांचीही भेट घेतली होती. अमेरिकेची आणि तालिबानची गेले अनेक दिवस गुप्त पद्धतीने चर्चा सुरू होती. त्यात तोडग्याचीही शक्यता निर्माण झाली होती. पण तालिबानने हिंसाचाराचा मार्ग कायम ठेवत पुन्हा काबुल वर हल्ला केल्याने अध्यक्ष ट्रम्प यांनी अचानक ही चर्चाच रद्द केली. त्यामुळे सध्या तालिबान हवालदील झाल्याचे चित्र पहिल्यांदाच पहायला मिळाले आहे.