पहिल्या “राफेल’मधून भरारी घेणार राजनाथ सिंह

नवी दिल्ली- फ्रान्सच्या दस्सू एअरक्राफ्टने तयार केलेले आणि वर्ष 2019 च्या निवडणूक प्रचारात विरोधकांकडून रान उठवण्यात आलेले “राफेल’ हे अत्याधुनिक फायटर जेट येत्या 8 ऑक्‍टोबर रोजी भारताच्या ताब्यात मिळणार असून, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या जेटमधूनही उड्डाण करणार आहेत. हिंदुस्तान एरॉनॉटिक्‍स निर्मित “तेजस’ या स्वदेशी बनावटीच्या फायटर जेटमधून नुकतेच उड्डाण केल्यानंतर आता “राफेल’मधूनही राजनाथ सिंह उड्डाण करणार असल्याचे वातूदलप्रमुख एअर चिफ मार्शल आर के एस बी भदौरिया यांनी जाहीर केले आहे.

वर्ष 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कॉंग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहूल गांधी यांच्यासह सर्वच विरोधकांनी “राफेल’ विमानाच्या खरेदीतील भ्रष्टाचारावरुन रान उठवण्यात आले होते. मात्र, त्यामधीले एकही मुद्दा विरोधकांना सिद्ध करता आला नव्हता.

आता भारत सरकारने दिलेल्या ऑर्डरनुसार, एकूण 59 हजार कोटी रुपयांच्या 36 फायटर जेटपैकी पहिले विमान 8 ऑक्‍टोबरला पंजाबमधील अंबाला येथील वायूदलाच्या तळावर लॅंड होणार आहे. “पाकिस्तान आणि चीनसारख्या शत्रूराष्ट्रांना धूळ चारण्यासाठी वायूदलाची क्षमता अधिक बळकट होण्याच्या दृष्टीने “राफेल’ विमाने भारतासाठी अत्यंत उपयोगी आहेत. ही विमाने अत्यंत आधुनिक आणि क्षेपणास्त्रांचा मारा करण्यासाठी सज्ज असल्याने ती “गेमचेंजर’ ठरतील,’ असेही भदौरिया यांनी म्हटले आहे.

पहिले “राफेल’ विमान या आठवड्यात भारताच्या ताब्यात येत असून आणखी चार विमाने मे 2020 पर्यंत तर उर्वरीत 31 विमाने एप्रिल 2022 पर्यंत भारतीय वायूदलाच्या ताब्यात येणार आहेत. पहिल्या पाच विमानांच्या ताफ्यासाठी 10 पायलट्‌स, 10 फ्लाईट इंजिनियर्स तसेच 40 एरॉनॉटीकल टेक्‍निशियन्सना फ्रान्समध्ये प्रशिक्षण देण्यात येऊन, ते भारतीय वायूसेनेत “राफेल’च्या फ्लीटवर काम करतील.

पंजाबमधील अंबाला येथील “17-गोल्डन ऍरो’ हा वायूदलाचा तळ भारत-पाकिस्तान सीमेजवळ असून येथे एकूण 18 “राफेल’ विमाने सज्ज ठेवण्यात येणार आहेत. त्यासाठी या ‘गोल्डन ऍरो’ तळावर आवश्‍यक त्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. तर पश्‍चिम बंगालमधील हासिमीरा येथील “101-फाल्कन’ स्क्वाड्रनकडून अन्य 18 “राफेल’ची युद्धसज्जता सांभाळली जाणार असल्याचेही वायूदलाच्या सूत्रांनी सांगितले आहे. हा वायूदलाचा तळ भारत-चीन सीमारेषेच्या जवळ आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.