निशिकांत पाटील यांचे डोळे टपटपले
इस्लामपूर – इस्लामपूर मतदारसंघात महायुतीकडून शिवसेनेला जागा गेल्याने भाजपाकडून तयारी करणाऱ्या नगराध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी निवडणूक लढवावी व उमेदवारी अर्ज भरावा यासाठी रवी चव्हाण व अप्पा शिंदे या दोघा तरुणांनी रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. सकाळी अकरापासून निशिकांत पाटील यांच्या निवासस्थानी हजारो तरुणांनी ठिय्या मांडला.
निशिकांत दादांच्या विजयाच्या घोषणांनी निवासस्थान परीसर दणाणून गेला होता. पक्ष तर पक्ष, नाहीतर अपक्ष असा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ शिवसेना पक्षाला गेल्याचे समजताच प्रकाश शैक्षणिक संकुलात भाजपा पदाधिकारी व निशिकांतदादा प्रेमींनी तातडीची बैठक बोलावून मुख्य दावेदार निशिकांत पाटील हेच आहेत. भर उन्हात कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. अनेकांना अश्रू आवरता आले नाहीत. यावेळी निशिकांतदादा तुम आगे बढो…हम तुम्हारे साथ है, एकच वादा… निशिकांतदादा या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आमचा पक्ष, आमची जात आणि आमचा धर्म एकच तो म्हणजे निशिकांतदादा असल्याचे कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
निशिकांत पाटील म्हणाले, जनता हीच माझी संपत्ती आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मॅनेज होणारे नाहीत. त्यांना मॅनेज करणारा जन्माला यायचा आहे. हे विरोधकांनी लक्षात घ्यावे. तालुक्यातील पुढाऱ्यांनी भितीपोटी विरोधकांशी तडजोड केली आहे.तडजोड करणाऱ्यांचाही हिशोब चुकता केला जाईल.
यावेळी कोमल बनसोडे, मंगल शिंगण, शिवाजीराव पवार, भास्कर कदम, गणेश हराळे, संतोष घनवट, प्रमोद माने, पै. रणजित पाटील, मुकूंद कांबळे, संदीप सावंत, यदुराज थोरात, प्रमोद डांगे, दिलीप कुंभार उपस्थित होते. जनसमुदाय व कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून मनोगत व्यक्त करताना निशिकांत दादांचे डोळे अश्रूंनी भरले. कार्यकर्त्यांनी दादा आता लढायचं…जिंकायचं…अशा घोषणा दिल्या. यावेळी दादांनी तुम्ही सर्वजण माझ्याबरोबर आहात का? असे विचारताच कार्यकर्त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्याबरोबर असल्याचे सांगितले.