शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी पाच जणांनी सहा उमेदवारी अर्ज नेले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी दिली. आज सकाळपासून शिरूर तहसीलदार कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा कडक बंदोबस्त होता.
तहसीलदार कार्यालयामध्ये फक्त उमेदवारी अर्ज व निवडणुकीसंदर्भात काम असलेल्या नागरिकांना प्रवेश मिळत होता. शिरूर तहसील कार्यालयाबाहेर असलेल्या मोकळ्या जागेत उमेदवारी अर्ज विक्री सुरू होती. वेगवेगळ्या परवानग्या व त्यासाठी लागणारे अर्ज याठिकाणी दिले जात होते. शिरूर-हवेली मतदार संघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी तयारी पूर्ण केली असून याबाबतचे प्रशिक्षण लवकरच देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिरूर हवेली विधानसभेसाठी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चंदन किसन सोंडेकर यांनी दोन उमेदवारी अर्ज, सतीश कृष्णाजी भालेराव, बाळासाहेब तुकाराम मिसाळ, सचिन साहेबराव धुमाळ, सुभाष बुधाजी कोळपे यांनी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज विकत घेतला आहे. असे या पाच जणांनी मिळून उमेदवारी अर्ज विक्री झाली आहे.