मॉर्डन विद्यालयातील उपक्रम – संस्कृत भाषा मंडळाचा पुढाकार
पिंपरी – संस्कृत ही प्राचीन काळातील भाषा असल्याने तिला महत्त्व आहे. तसेच संस्कृत देवांची भाषा म्हणून ओळखली जाते अशा भाषेचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा या हेतूने निगडी येथील मॉडर्न विद्यालयात संस्कृत भाषा मंडळाच्या वतीने संस्कृत जागृती अभियान राबविण्यात आले.
प्राचार्य सतीश गवळी, शाळा समिती अध्यक्ष शरद इनामदार, संस्कृत विभाग प्रमुख गौरी देशपांडे, सुरेखा कामथे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषेतील विविध पुस्तके, ग्रंथ यांचे प्रदर्शन ठेवले होते. यातून आपल्या संस्कृतमधील ग्रंथ संपदेचा परिचय विद्यार्थ्यांनी करून दिला. तर काही विद्यार्थ्यांनी आश्रमाची प्रतिकृती तयार करून पूर्वीच्या काळातील गुरू-शिष्य परंपरेची माहिती दिली. आजच्या दैनंदिन वापरातील अनेक वस्तूंची चित्रे, शरीराचे विविध अवयव, कवींची माहिती, फळे, फुले आणि पक्षी यांची संस्कृत भाषेतील नावे लिहिली होती. यामुळे शाळेतील मुलांना संस्कृत भाषेबद्दल गोडी निर्माण झाल्याचे संस्कृत विभाग प्रमुख गौरी देशपांडे यांनी सांगितले.
या उपक्रमासाठी शिक्षिका कुसुम पाडळे, वैशाली देसले, अनुराधा आंबेकर, शिवाजी अंबिके तसेच संस्कृत मंडळाच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, सहकार्यवाह प्रा.ज्योत्स्ना एकबोटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालकांनी प्रदर्शनाला
भेट दिली.