“टेस्ट ट्यूब बेबी’साठी पाच लाख रुपयांची मागणी
पिंपरी – मूल होत नसल्याच्या कारणावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच टेस्टट्यूब बेबीसाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी सासरकडील व्यक्तींनी केली. तसेच फिर्यादी महिलेच्या पतीचे दुसरे लग्न लावून दिले. ही घटना चिखली येथे घडली. पती धर्मेश वाघमारे, सासू कविता वाघमारे, सासरे विष्णू वाघमारे, दिर भीमेश वाघमारे, नणंद वर्षा रुपेश कामले, नंदावा रुपेश कामले, भागाबाई मानकर, कृष्णाबाई शिंदे (सर्व रा. शाहू चौक, लातूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 25 वर्षीय महिलेने गुरुवारी (दि. 26) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2011 ते 10 डिसेंबर 2018 या कालावधीमध्ये ही घटना घडली. फिर्यादी यांचा विवाह आरोपी धर्मेश वाघमारे याच्याशी जानेवारी 2011 मध्ये झाला. फिर्यादी महिलेला मूल होत नसल्याच्या कारणावरून आरोपींनी तिला वेळोवेळी अपमानास्पद वागणूक दिली. शिवीगाळ करत मारहाण करून जेवण न देता तिचा छळ केला. लग्नात केलेल्या मागणीप्रमाणे सोने दिले नाही. यावरुन देखील शिवीगाळ केली.
मूल होत नसल्याने टेस्ट ट्यूब बेबीसाठी माहेराहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली. त्या पैशांसाठी वारंवार तगादा लावून विवाहितेचा छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपी भागाबाई आणि कृष्णाबाई या दोघीनी मिळून फिर्यादी यांच्या संमतीशिवाय त्यांच्या पतीचे दुसरे लग्न लावल्यानेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हस्के याबाबत अधिक तपास करीत आहेत.