“या तारखेला नेत्याचे पक्षांतर होणार’, “त्यांचे पक्षांतर म्हणून पक्षातील नेता अन्य पक्षात जाणार’, “पक्षांतराचा मुहूर्तही ठरला’, अशा सोशल मीडियातून आणि कानोकानी सुरू असलेल्या चर्चेने पक्षांतराच्या वाटेवर असलेले नेतेच नव्हे, तर संबंधित पक्षाचे कार्यकर्तेही कमालीचे संभ्रमात पडले आहेत. राजकीय गोटात पक्षांतराच्या चर्चेला प्रचंड पेव फुटले असून यातून काही नेते पक्षात राहून “मलिद्या’साठी श्रेष्ठींवर दबाव आणत असल्याचेही बोलले जात आहे.
जामखेड तालुक्यात जवळपास सर्वच राजकीय पक्षांत गटबाजी असून, यातून पक्षांतर दुफळ्या व मतभेदाने डोकेवर काढले आहे. निवडणुकाजवळ आल्या की नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची आवक – जावक सुरू होते. त्याच अनुषंगाने निवडणुकीचे वारे वाहत असून निवडणूक महिन्यावर आली आहे. राज्यभर कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील मातब्बर नेते शिवसेना-भाजपत प्रवेश करीत असल्याने हे लोण जामखेडपर्यंतही आल्याचे दिसून येते.
राष्ट्रवादीतून भाजपत जाणाऱ्यांचे प्रमाणात जास्त असताना जामखेडमध्ये भाजपतून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नेत्यांचे प्रवेश होत आहेत. मतदारसंघात भाजपला वन-वे वाटणारी निवडणूक आता रोहित पवार यांच्यामुळे दुरंगी होणार आहे. अजूनही उमेदवारांची नावे जाहीर झाली नसल्याने भाजपकडून राम शिंदे तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडुन रोहित पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.