प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 26 – मित्र मंडळ चौकात ओढ्याशेजारी असलेल्या बंगल्यातील तळघरात अडकलेल्या 10 महिन्यांच्या मुलासह 5 जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. शहरात पावसाचा जोर वाढल्यामुळे मित्रमंडळ चौकातील एका इमारतीत कुटुंबियांसह चिमुरडा अडकला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेत टबच्या आधारे 10 महिन्यांच्या चिमुरड्याला आणि त्याच्या कुटुंबियांना बाहेर काढले.
पावसाचा जोर वाढल्यामुळे बुधवारी (दि. 25) रात्री अकरानंतर मित्र मंडळ चौकातील बंगले, विविध संस्थांच्या कार्यालयात पाणी घुसू लागले. चौकातील एका इमारतीत मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले होते. त्यामुळे तळघरात एक कुटुंब पाण्यात अडकल्याने प्रचंड आरडाओरड सुरू झाली. स्थानिकांनी अग्निशमन दलाला माहिती देऊन रस्त्यावरून जाणाऱ्या एका अग्निशमन दलाच्या गाडीला थांबवित घटनेची माहिती दिली. त्यानंतर जवानांनी इमारतीच्या ठिकाणी धाव घेत पाहणी केली. एकाच कुटुंबातील 5 जण पाण्यात अडकले होते. घरात 5 ते सहा फूट पाणी शिरल्यामुळे आजी आजोबा घाबरलेल्या अवस्थेत स्टुलावर उभे होते.
अग्निशमन दलाने त्यांना आधार देत दोरीच्या सहायाने बाहेर काढले. त्यानंतर जोडपे आणि त्यांचे 10 महिन्यांचे बाळही घरामध्ये होते. अशा परिस्थितीत देवदूत मारुती देवकुळेंनी एक टब आणून बाळाला त्यामध्ये बसविले. मात्र, चिमुरडा ओरडत असल्याने आणि पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने टब हेलकावे खात अपघाताची शक्यता होती.
मात्र, अग्निशमन दलातील जवानांनी चिमुरड्याला टबमध्ये बसवून दोरीने बांधून बाहेर काढताच नागरिकांनी टाळ्या वाजवित जवानांचे स्वागत केले. अग्निशमन दलातील मारुती देवकूळे, कैलास आकाडे, अनिल कांबळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.