नवी दिल्ली: जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही.सिंधूच्या विजेतेपदात मोठा वाटा उचलणाऱ्या दक्षिण कोरियन प्रशिक्षक किम जिहुयान यांनी वैयक्तिक कारणास्तव भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजिनामा दिला आहे.
जिहुयान यांचे पती रिची मॅर हे न्यूझीलंडमध्ये आहेत. त्यांना नुकताच अल्प्शा आजारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे त्यांच्यासोबत मला किमान 4 ते 6 महिने थांबावे लागणार आहे. त्यामुळे मला प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळू शकणार नाही असे जिहुयान यांनी राजिनामा पत्रात म्हटले आहे.
भारतीय बॅडमिंटन महासंघाने या वर्षाच्या सुरूवातीस महिलांच्या एकेरीसाठी प्रशिक्षक म्हणून जिहुयान यांची नियुक्ती केली होती. भारताचे मुख्य प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी जिहुयान यांच्या राजिनाम्याचे वृत्तास दुजोरा देत सांगितले की, त्यांचा हा निर्णय भारतीय खेळाडूंसाठी मोठा धक्का आहे. विशेषत: आगामी ऑलिम्पिक स्पर्धा दहा महिन्यांवर आली असताना त्यांच्या मार्गदर्शनापासून आमच्या खेळाडूंना वंचित रहावे लागणार आहे. त्यांच्या जागी लवकरच नवीन प्रशिक्षक नियुक्त केला जाईल. शक्यतो कायमस्वरूपी प्रशिक्षक नियुक्त करण्याबाबत माझा आग्रह राहणार आहे.
सिंधूने सांगितले की, माझ्यासाठी हा अनपेक्षित धक्का आहे. मात्र, त्यांचे कारण अतिशय योग्य आहे. शेवटी प्रत्येकास आपल्या कुटुंबियांना प्राधान्य देण्याची आवश्यकता असते. त्यांचे पती लवकर बरे होतील अशी मला आशा आहे. अंतिम फेरीत विजय मिळविण्यात मी कमी पडत होते. हा माझा दोष कमी करण्यात जिहुयान यांनी मला खूप मोलाचे मार्गदर्शन केले आहे. त्याचा मला दीर्घकाळ फायदा होणार आहे.