सोशल मीडियावर श्रेयवाद; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
बिदाल – विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होणार असल्याने माण-खटाव मतदारसंघात विकासकामांचे भूमिपूजन आणि हा उद्घाटनांचे नारळ फोडण्याचे कार्यक्रम जोरात सुरू आहेत. विकासकामांबाबत सोशल मीडियावर श्रेयवाद रंगत असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
विद्यमान आमदार, माजी आमदार, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व सदस्य दिवसभरात किमान चार ते पाच ठिकाणी भूमिपूजनाचे कार्यक्रम उरकत आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांत अनेक कामे झाली आहेत. काही पदाधिकारी आणि सदस्यांना आमदारकीचे वेध लागले आहेत. त्यातून मिळेल त्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न इच्छुकांकडून सुरू आहे. गावाच्या विकासासाठी जिल्हा परिषदेत भांडून किती निधी आणला, ते सदस्य उच्चरवाने सांगत आहेत. विशेषतः विधानसभा निवडणुकीत इच्छुक असलेले सदस्य निधीचे आकडे फुगवून सांगत आहेत.
सोशल मीडियावर फोटो अपलोड केले जात आहेत. मुळात ज्या कामांच्या निविदाही निघाल्या नाहीत, अशा कामांचेही भूमिपूजन करण्यात काही पदाधिकारी व सदस्यांनी मागेपुढे पाहिलेले नाही. भूमिपूजन आणि उद्घाटनांचे “इव्हेन्ट’ झाले आहेत. सोशल मीडियावर राजकीय श्रेयवाद रंगत असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
माण-खटाव मतदारसंघात भाजपचे कमळ फुलावे यासाठी जयकुमार गोरे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि खा. रणजितसिंह निंबाळकर यांच्यासमोर कार्यकर्त्यांची ताकद दाखवली. शेखर गोरे यांनीही शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर तिकिटासाठी शिवसेना नेते आदेश बांदेकर यांच्यासमोर महिला मेळाव्यात शक्तिप्रदर्शन केले. माजी आमदार दिलीप येळगावकर, प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, डॉ. संदीप पोळ यांनी एकत्र येऊन “आमचं ठरलंय’ टीममधून एकच उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. प्रमोद गावडे हे मैदानात उतरण्याची शक्यता आहे.