पुणे -शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. नेहमी वाहनांमुळे फुललेले रस्ते गणेशोत्सव काळात भाविकांच्या गर्दीने फुलल्याचे पाहायला मिळतात.
शेवटचे 6 दिवस देखावे रात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेकजण कामे संपवून गणपतीचे दर्शन घेण्यासाठी जातात. त्यामुळे विविध भागांमध्ये वाहतूक कोंडी देखील होते. अनेक रस्ते वाहतूक विभागाने बंद ठेवले आहेत. तरीदेखील शहराच्या विविध भागांतून येणाऱ्या गणेश भक्तांनी वाहने बेशिस्तपणे रस्त्यात उभी केल्याने वाहतूक कोंडीमध्ये भर पडते. ही परिस्थिती टाळण्यासाठी “पुणे ट्रॅफवॉच’ भाविकांची मदत करणार आहे.
शहराच्या विविध परिसरांमध्ये बंद केलेले रस्ते, वळविलेले रस्ते, पार्किंग व्यवस्थेची माहिती आता प्रत्येकाला एका क्लिकवर समजणार आहे. वाहतूक पोलिसांच्या “पुणे ट्रॅफवॉच’ या संकेतस्थळावर भाविकांना दि. 11 सप्टेंबरपर्यंत करण्यात आलेल्या वाहतूक बदलांची माहिती मिळणार आहे.
याचा नागरिकांनी वापर केल्यास शहरामध्ये सहज प्रवास करणे सोपे जाणार आहे. त्यामुळे याचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेच्या वतीने ट्विटरवर करण्यात येत आहे. यापूर्वी वाहतूक शाखेने पालखी, दहीहंडी यासह पावसामुळे बंद ठेवलेल्या रस्त्यांची माहिती नागरिकांना “पुणे ट्रॅफवॉच’च्या माध्यमातून दिली होती.