वॉशिंग्टन – जगभरातील तब्बल 40 कोटी फेसबुक वापरकर्त्यांचे फोन नंबर फेसबुककडून उघड झले आहेत. त्यामुळे गोपनीयतेबाबत मोठी त्रुटी फेसबुककडून राहून गेल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. फेसबुकच्या या ग्राहकांचे फोन क्रमांक त्यांच्या फेसबुक खात्याला जोडलेले होते. मात्र हे सर्व फोन नंबर ऑनलाईन पाहता येऊ शकले असल्याचे अमेरिकेतील तंत्रज्ञानविषयक वेबसाईटने म्हटले आहे.
माहिती उघड झालेल्य सर्व्हरमध्ये 419 दशलक्ष फेसबुक वापरकर्त्यांच्या नोंदी आहेत. त्यामध्ये अमेरिकेतील 133 दशलक्ष, व्हिएतनाममधील 50 दशलक्ष तर ब्रिटनमधील 18 दशलक्ष खातेदारांचा समावेश आहे, असे “टेकक्रच’ या वेबसाईटने म्हटले आहे. उघड झालेल्या डेटाबेसमध्ये फेसबुक युजर आयडी, प्रत्येक खात्यात संलग्न केलेली विशिष्ट आकडेवारी, प्रोफाइलचे फोन नंबर तसेच काही खातेदारांचे लिंग, त्यांच्या भौगोलिक स्थानांची माहितीची यादीही टेकक्रंचने दिली आहे.
सर्व्हरला पासवर्ड नव्हता, अर्थात कोणीही डेटाबेसमध्ये प्रवेश करू शकत होता. टेकक्रंचने फेसबुकच्या होस्टशी संपर्क साधला, तेव्हा तो बुधवारी उशीरापर्यंत ऑनलाइन राहिलेला होता. फेसबुकने ही त्रुटी राहिल्याचे मान्य केले अहे. 419 दशलक्ष ग्राहकांच्या किमान निम्म्या ग्राहकांच डाटाच उघड झाल्याचे फेसबुकने म्हटले आहे. बऱ्याच नोंदी डुप्लिकेट होत्या आणि डेटा जुना होता, असेही फेसबुकने म्हटले आहे.
हा डेटासेट काढून टाकण्यात आला आहे आणि फेसबुक अकाउंट्समध्ये काहीही छेडाछेड् केल्याचा पुरावा आम्हाला मिळालेला नाही, असे फेसबुकच्या प्रवक्त्याने सांगितले. 2018च्या केंब्रिज ऍनलिटीका प्रकरणात फेसबुकच्या लक्षावधी वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती हॅक करण्यात आल्याचे उघड झाले होते.