हळद-कुंकवाच्या सड्यांनी स्वागत
आज जेवण, उद्या विसर्जन
सातारा – गणेशाच्या आगमनानंतर सुवासिनींना वेध लागले होते, ते गौरींच्या आगमनाचे. घरोघरी गुरुवारी गौराई विराजमान झाल्या. हळद-कुंकवाचे सडे घालत सुवासिनींनी गौराईंचे स्वागत केल्यानंतर घराघरांत त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली. आता दोन दिवस गौराई घरात राहून आशीर्वाद देणार आहेत.
“पाऊस पडू दे, गंगा भरू दे, भादव्यात मी येईन गं… तेरड्याच्या फुलांवर, वस्ती मी करीन गं’, असा निरोप गेले महिनाभर पाठविणारी गौराई माहेरी आल्याने सगळीकडे आनंदीआनंद आहे. गौराईला आणण्यासाठी गुरुवारी फुलोरा घेऊन सुवासिनींनी आपापल्या भागात गर्दी केली होती. फुले, आघाडा, दुर्वा, कण्हेरीच्या फुलांच्या माळांनी सजविलेले, लखलखीत घासलेले तांब्या-पितळेचे न्हावण घेऊन आणि जरीच्या साड्या, अंगभर दागिने, हातभर बांगड्या लेवून गौराईची गीते गात गौराईंच्या आगमनाचा सोहळा शहरासह जिल्ह्यात रंगला.
अनुराधा नक्षत्रावर गुरुवारी गौरींचे आवाहन झाले असून, उद्या (शुक्रवार) ज्येष्ठा नक्षत्रावर जेवण तर शनिवारी मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन होणार आहे. गौरींबरोबरच काही घरगुती गणपतीचेही विसर्जन होणार आहे. गुरुवारी सकाळपासूनच सर्वत्र गौरीचे आगमन झाले. हिरवा शालू, नथ आणि विविध अलंकारांनी नटलेल्या महिला आणि मुलींच्या सामूहिक आविष्काराला गौराई गीतांची साथ लाभल्याने अस्सल मराठी संस्कृतीचे दर्शन ग्रामीण भागात घडले. झेंडूसह विविध फुलांनी बाजारपेठ फुलली असली तरी फुलांचे व भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत.