पुणे – हाय सिक्युरिटी नंबरप्लेटमुळे रेडियम नंबर प्लेट बसविणाऱ्या दुकानदारांचा व्यवसाय डबघाईला आला आहे. यामुळे रेडियम आर्टस् असोसिएशनचा वतीने नंबरप्लेटच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. यावेळी सुमारे 800 रेडियम दुकानदारांनी सहभाग घेतला होता.
नव्याने खरेदी केलेल्या वाहनांना हायसिक्युरिटी नंबरप्लेट बसविणे अनिवार्य आहे, असे आदेश केंद्र सरकारने दिले होते. 1 एप्रिलपासून लागू झालेल्या आदेशामुळे वाहन वितरकांकडून नंबरप्लेट ग्राहकांना देण्यात येत आहेत. यामुळे रेडीयम व्यावसायिकांना नुकसान सहन करावे लागत आहे. याबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी सोमवारी शिवाजीनगर पोस्ट ऑफीसपासून निघालेला हा मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयाला धडकला. यावेळी व्यावसायिकांनी सरकारविरोधी घोषणा देत निदर्शने केली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रदीप शिवाजीराव पाटील, पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष बालाजी परभणे, राहूल दरेकर, वामन जंगम, वहिद शेख, सचिन कुकडे, पांडुरंग पवार, वसिम सय्यद यासह शहरातील रेडीयम विक्रेते उपस्थित होते.
“नंबर प्लेट बनविण्याचे काम आम्हाला द्या’
शासनाने हायसिक्युरिटी नंबर प्लेट सक्तीच्या केल्यामुळे आम्हा रेडियम नंबर प्लेट बनविणाऱ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने या हायसिक्युरिटी नंबरप्लेट तातडीने बंद कराव्यात, अन्यथा या नंबरप्लेट बनविण्याचा अधिकार व्यावसायिकांना मिळावा. आम्ही देखील याची नोंदणी वेळच्या वेळी शासकीय दरबारी करू. शासनाने सध्या या नंबरप्लेट बनविण्याचे टेंडर बाहेरील कंपन्यांना दिले आहे. महाराष्ट्रातील व्यावसायिकांना मिळावे, असे मत यावेळी पाटील यांनी व्यक्त केले.