स्वस्त घरांसाठी पालिका- “ऐश्‍वर्यम’ची भागीदारी

“पीपीपी’वर 1169 सदनिका ः नागरिकांना अल्प दरात मिळणार घरे

पिंपरी – चिखलीतील गृहप्रकल्पासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने ऐश्‍वर्यम ग्रुप यांच्यासोबत पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) करार केला आहे. महापालिका व खासगी बांधकाम व्यावसायिकांमध्ये साकारत असलेला हा शहरातील पहिलाच गृहप्रकल्प आहे. त्यामुळे अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना सवलतीच्या दरात सदनिका उपलब्ध होतील, अशी माहिती सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत महापौर राहुल जाधव व आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

यावेळी ऐश्‍वर्यम हमाराचे संचालक सतीश अग्रवाल, दीपक माने, महापालिकेचे शहर अभियंता राजन पाटील आदी उपस्थित होते. अधिक माहिती देताना आयुक्त हर्डीकर म्हणाले की, आवास योजनेअंतर्गत पीपीपी तत्त्वावर घरे उपलब्ध करुन देण्यासाठी विकसकांकडून अर्ज मागविले होते.

हे अर्ज छाननीसाठी तांत्रिक समितीकडे पाठविण्यात आले. या समितीने हे छाननी केलेले अर्ज केंद्राकडे पाठविले. तेथील उच्चस्तरीय समितीकडून झालेल्या छाननीत ऐश्‍वर्यम ग्रुप पात्र ठरला. केंद्र व राज्य सरकारच्या मान्यतेनंतर महापालिकेने ऐश्‍वर्यम ग्रुपसोबत पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप करार केला आहे. त्यामुळे नागरिकांना स्वस्त घरे उपलब्ध होणार आहेत.

या प्रकल्पात एकूण 2 हजार 132 घरे असून त्यामध्ये ईएब्ल्यूएस व एलआयई या गटासाठी महापालिकेच्या मान्यतेने विकसकाकडून 1 हजार 169 घरांचे वितरण केले जाणार आहे. त्यामोबदल्यात ऐश्‍वर्यमला आर्थिक दुर्बलांसाठी असलेल्या अडीच टक्के एफएसआयचा लाभ मिळणार आहे. या प्रकल्पात घर घेणाऱ्या एलआयई गटातील ग्राहकांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अडीच लाख अनुदान मिळू शकेल, असे आयुक्तांनी सांगितले.

सतीश अग्रवाल म्हणाले की, ऐश्‍वर्यम हमारा या प्रकल्पात ज्या 1 बीएचके घराची 25 लाख 50 हजार अशी मूळ किंमत होती ते घर आता या योजनेमुळे ग्राहकांना घराच्या आकारानुसार 15 लाख 50 हजार ते 19.73 हजार मिळेल. 38 लाखात मिळणारे 2 बीएचके घर आता आकारानुसार 21 लाख 16 हजार ते 34 लाख 81 हजार रुपयात मिळेल. या विशेष भागीदारीमुळे स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, जीएसटी, लीगल चार्जेस, इन्फ्रा व इतर शुल्क असे सर्व या किंमतीमध्ये समाविष्ट केले गेले आहेत. प्रकल्पात घर घेणाऱ्या ग्राहकांना अग्रगण्य बॅंकांकडून कर्ज सुविधा उपलब्ध आहे.

उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम हे वैशिष्ट्‌य असणाऱ्या ऐश्‍वर्यम हमारा या प्रकल्पात राहायला येणाऱ्या लोकांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा पूर्ण विचार करूनच येथील घरे बांधली आहेत. स्विमिंग पूल, क्‍लब हाऊस, जिम, मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र जागा व इतर अत्याधुनिक सुविधा देण्यात येणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.