आयुक्त निवासावर मोर्चा ः “शितलबाग पूल’ कामाची चौकशी करण्याची मागणी
पिंपरी – शितलबाग पादचारी पुलाच्या कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी अपना वतन संघटनेच्या वतीने “पुंगी बजाओ’ आंदोलन करण्यात आले. भोसरी येथील शितलबाग पादचारी पूल ते महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या निवासस्थानापर्यंत पुंगी वाजवत मोर्चा काढण्यात आला.
अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख यांना महापालिकेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना शितलबाग भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करणेबाबत पत्र दिले होते.
परंतु, पत्राची दखल न घेतली गेल्याने “पुंगी बजाओ, आयुक्त हटाओ’ आंदोलन करण्यात आले. यावेळेस अनेक संघटनांचे व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याठिकाणी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या मध्यस्तीनंतर आयुक्तांनी याप्रकरणी बैठकीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.