अशोक पाखले यांना मिळाला कुंतीमातेच्या रथात बसण्याचा मान
उंब्रज – भीमसेन महाराज, कुंती मातेच्या जयघोषाने ऐक्याची शिकवण देणारा शकडो वर्षाची धार्मिक परंपरा असणारा भीम-कुंती भेटीचा उत्सव सोमवारी गुलालाची उधळण करत हजारो भाविक भक्तांच्या साक्षीने भक्तिमय वातावरणात पार पडला. भीम भीम राजेस राजेस महाराज की जय च्या गजराने अवघी उंब्रजनगरी दुमदुमून गेली होती.
या उत्सवाची सुरुवात श्रावण महिन्याच्या सुरुवातीला भीमाच्या मूर्तीसाठीची लागणारी काळी माती आणण्याने होते. श्रावणातील शेवटच्या सोमवारी (सरता सोमवार) या उत्सवाचा मुख्य दिवस असतो. या दिवशी होणारी भीम-कुंती या मायलेकरांची भेट हे या उत्सवाचे मुख्य आकर्षण असते.
आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास भीमसेन मंडपात मिरवणुकीमध्ये कुंती मातेस रथात घेऊन बसण्यासाठी जो मान आहे. त्यासाठी बोली पध्दतीने लिलाव करण्यात आला. यामध्ये अनेकांनी सहभाग घेतला होता. हा मान 32 हजार एक रूपयांची सर्वाधिक बोली करत अशोक श्रीपती पाखले यांनी मिळवला.
दुपारी एक वाजणेच्या सुमारास महामुनी यांच्या घरी कुंती मातेची विधीवत पूजाअर्चा करून कुंती मातेची मूर्ती रथामध्ये विराजमान केल्यानंतर पाखले हे रथात मूर्ती शेजारी विराजमान झाले. मग ही मिरवणूक महामुनी यांच्या घरापासून भैरवनाथ मंदिर, ग्रामपंचायत चौक, पेठेतील हनुमान मंदिर ते मुख्य बाजारा पेठेत आली. तेव्हा भाषिकांनी रथावर गुलालाची उधळण केली. शेतकरी आपल्या शेतातील भाजीपाला तर महिला खण-नारळ, टोपडी या प्रसंगी रथावर अर्पण करतात. टाळ मृदंगाच्या व ढोल ताशाच्या गजरात रथ पुढे सरकत होता. यावेळी बॅन्डच्या तालावर तरुणांनी ठेका धरला होता.
ही मिरवणुक पुढे पाराजवळील मारुतीजवळ आली. मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून परत बाजारपेठतून भीम मंडपात सायंकाळी आली. यावेळी माता कुंती व पुत्र भीमसेन या मायलेकरांच्या भेटीचा सोहळा याची देही याची डोळा पाहणे म्हणजे एक पर्वणीच होती.
यावेळी मान्यवरांचे हस्ते विधीवत पूजाअर्चा करण्यात आली. यानंतर कुंती मातेस भीम मंदिरात स्थापना करण्यात आले. यावेळी रथावर अर्पण केलेल्या वस्तूंचा लिलाव झाला. उत्सवानिमित अनेक मेवा मिठाई, खेळणी, उंच उंच आकाश पाळणे व इतरही मनोरंजनाची साधने यांनी बाजारपेठ गर्दीने फुलून गेली होती. उंब्रज पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. रात्री उशिरापर्यंत भीम मंडपात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.