कॅम्पस सुरू करण्याच्या हालचाली : व्यवस्थापन परिषद बैठकीत ठराव
पुणे -जम्मू-काश्मिरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर पुण्यातील काही शिक्षणसंस्थांनी तेथे कॅम्पस सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानंतर आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानेही येथे कॅम्पस सुरू करण्यासाठी पाऊल उचलले आहे.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची शुक्रवारी बैठक झाली. काश्मिरमधील 370 कलम रद्द केल्यानंतर अनेक इंडस्ट्री तेथे गुंतवणुकीची तयारी दर्शविली आहे. त्यात पुण्यातील काही शिक्षण संस्थाही इच्छुक आहेत. तसेच केंद्र सरकारकडून काश्मीर येथे शैक्षणिक पूरक वातावरण निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाने काश्मिर येथे संकुल निर्माण करावे, असा ठराव मांडला. तो व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.
काश्मीरमध्ये शैक्षणिक संकुल निर्माण करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. राज्य सरकारने विशेष बाब म्हणून संकुल स्थापनेस परवानगी दिल्यानंतर विद्यापीठाकडून पाऊल उचलण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. काश्मीर येथे अनेक शिक्षण संस्था कार्यरत आहेत. त्यांच्या सहकार्याने पुणे विद्यापीठाकडून स्थानिक गरजा पाहून कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करण्याचा एक पर्याय आहे. तर दुसरा पर्याय तेथील शिक्षणसंस्थांमध्ये एखादी शाखा सुरू करण्यासाठी मदत करणे. तसेच पुण्यातून ज्या संस्था काश्मीर येथे कॅम्पस सुरू करणार आहेत, त्यांनाही मार्गदर्शन करणे. या पद्धतीच्या पर्यायावर पुणे विद्यापीठ विचाराधीन आहे. दरम्यान, काश्मीर खोऱ्यात विशेषत: पर्यटन क्षेत्र सुधारण्यास मोठी संधी आहे. तसेच तेथे सफरचंद मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असते. त्याला अनुसरून काही कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम तेथील शिक्षण संस्थांच्या सहकार्याने सुरू करण्याच्या पुणे विद्यापीठ विचारात आहे.
काश्मीरमधील बदलत्या परिस्थितीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तेथे शैक्षणिक केंद्र-संकुल सुरू करावे आणि त्यासाठी विशेषबाब म्हणून परवानगी मागणारा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवावा. असा राजेश पांडे यांनी मांडलेला हा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला.
– प्रफुल्ल पवार, कुलसचिव