कंपन्या, राजकीय नेतेही पुढे येईनात : पूरग्रस्तांचे कारण देत स्पॉन्सरशीपला नकार
पुणे -बाजारातील आर्थिक मंदीचे सावट यंदाच्या गणेशोत्सवावरही घोंगावत असून मंडळांना वर्गणीची बंधने आल्याने आर्थिक खर्च भागविण्यासाठी हातभार लावणाऱ्या कॉर्पोरेट कंपन्यांनीही हात वर केले आहेत. त्यामुळे उत्सवासाठी निधी गोळा करताना, मंडळांची दमछाक होत असून विधानसभा निवडणुकाच हाच मंडळासाठी आशेचा किरण असल्याचे चित्र आहे.
पुणे शहरातील गणेशोत्सव हा जगभरात वैभवशाली मिरवणूक, मंडळांची आरस, तसेच समाज प्रबोधनाच्या उपक्रमांमुळे ओळखला जातो. तर शहरातील आर्थिक उलाढालीची सुरुवातही खऱ्या अर्थाने याच उत्सवामुळे सुरू होऊन गणेशोत्सव, नवरात्र आणि त्या पाठोपाठ आलेल्या दिवाळीपर्यंत चालते. त्यामुळे हजारो व्यवसायांना यातून चालना मिळते. शहरात सुमारे 3 हजार गणेश मंडळे आहेत. त्यांना गेल्या काही वर्षांत वर्गणी संकलित करण्यावर निर्बंध आले आहेत. त्यामुळे मंडळांकडून गणेशोत्सवात कॉर्पोरेट कंपन्यांची मंडळाच्या आवारात जाहिरात करून स्पॉन्सरशिप मिळविली जात होती. त्यामुळे गणेशोत्सवाचा खर्च भागविला जात होता. यावर्षी कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये आर्थिक मंदीचे सावट आहे. त्यातच या कंपन्या बेकायदेशीर जाहिराती करत असल्याने महापालिकेकडूनही त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, सुरक्षिततेच्या कारणास्तव पोलिसांकडूनही मंडळांना मर्यादीत जाहिरात फलक लावण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक मंदीने कॉर्पोरेट कंपन्या मंडळांना सहकार्य करण्यास पुढे येत नाही.
पूरग्रस्तांना मदत केली, यंदा माफ करा
कॉर्पोरेट कंपन्यांनी हात वर केल्याने मंडळांना राजकीय नेते तसेच नगरसेवकांचा आधार होता. मात्र, यावेळी नगरसेवकांनीही हात वर केले आहेत. पक्षाच्या आदेशानुसार, सांगली आणि कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मोठी आर्थिक मदत केली आहे. त्यामुळे तुम्हाला यंदा काहीच देता येणार नाही. असे सांगत नेत्यांकडूनही मंडळांची बोळवण केली जात आहे. त्यामुळे मंडळांसमोर विधानसभा निवडणुकीचे इच्छुक हा एकमेव पर्याय उरला आहे. त्यातही काही ठरावीक पक्षाचेच इच्छुकच मंडळांच्या प्रायोजकत्वासाठी पुढे येत आहेत. इतर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते इच्छूक असले तरी, निवडून येण्याची शाश्वती नसल्याने त्यांच्यांकडूनही आपल्या विधानसभा मतदारसंघाचा अंदाज घेत काही ठराविक मंडळांनाच आर्थिक मदत केली जात असून त्या ठिकाणी आपलाच प्रचार करण्याचे बंधन घातले जात आहे.