सिनसिनाटी टेनिस स्पर्धा : सेरेना विल्यम्सची माघार
सिनसिनाटी – रॉजर फेडरर व नोवाक जोकोविच या बलाढ्य खेळाडूंनी सिनसिनाटी टेनिस स्पर्धेतील अपराजित्व राखले. मात्र सेरेना विल्यम्सने पाठीच्या दुखण्यामुळे या स्पर्धेतून माघार घेतली. या स्पर्धेत सात वेळा अजिंक्यपद मिळविलेल्या फेडररने अर्जेन्टिनाच्या जुआन इग्नॅसिओ लोंडेरोवर 6-3, 6-4 असा सरळ दोन सेट्समध्ये पराभव केला.
या सामन्यात दुसऱ्या सेटमध्ये 2-2 अशी बरोबरी असताना पावसाचा व्यत्यय आला होता. त्यामुळे एक तास खेळ थांबविण्यात आला होता. सामना संपल्यानंतर फेडररने सांगितले की, पाऊस संपल्यानंतर कोर्टवर खेळणे थोडेसे अवघड जात होते. मात्र मी थोडासा सावध खेळ केला. जुआनविरूद्ध मी प्रथमच खेळलो. एटीपी मालिकेत त्याला यापूर्वी खेळताना मी कधी पाहिले नव्हते. मात्र प्रतिस्पर्धी कोणीही असला तरी एकाग्रतेने खेळण्याची वृत्ती माझ्या रक्तातच भिनली असल्यामुळे मी हा सामना गांभीर्यानेच खेळलो.
गतविजेत्या जोकोविचने सॅम क्युएरी याचे आव्हान 7-5, 6-1 असे संपुष्टात आणले. या लढतीमधील पहिल्या सेटमध्ये तीन वेळा जोकोविचकडून सर्व्हिसच्या दुहेरी चुका झाल्या. मात्र हा सेट घेण्यात त्याला यश आले. दुसऱ्या सेटमध्ये त्याने फोरहॅंडच्या ताकदवान फटके व बिनतोड सर्व्हिस असा बहारदार खेळ करीत क्युएरीला निष्प्रभ केले.
अन्य लढतीत स्टॅनिस्लास वॉवरिंकने माजी विजेत्या ग्रिगोर दिमित्रोवचा 5-7, 6-4, 7-6 (7-4) असा पराभव केला. पहिला सेट गमाविल्यानंतर त्याने परतीचे फटके व सर्व्हिसवर नियंत्रण मिळवित विजयश्री खेचून आणली.
महिलांच्या विभागात सेरेनाने झरिना दियासविरूद्ध पहिल्या फेरीच्या लढतीतून माघार घेतली मात्र तिची बहिण व्हीनसने गतविजेत्या किकी बर्टन्सला 6-3, 3-6, 7-6 (7-4) असा पराभवाचा धका दिला. 39 वर्षीय खेळाडू व्हीनसने चतुरस्त्र खेळ करीत अनुभवाच्या जोरावर हा सामना जिंकला.