पुणे – कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना लागणाऱ्या वैद्यकीय मदतीसाठी “राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल’तर्फे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी झेंडा दाखविल्यानंतर 8 रुग्णवाहिका, औषध साठा व 50 डॉक्टरांचे पथक कोल्हापूर व सांगलीला रवाना झाले.
या प्रसंगी खासदार वंदना चव्हाण, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, शहराध्यक्ष चेतन तुपे, डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, डॉ. सुनील जगताप, अंकुश काकडे, दिलीप बराटे, प्रशांत जगताप, डॉ. शिवदीप उंद्रे, डॉ. राजेश पवार व डॉक्टर सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. काळे म्हणाले, पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर शरद पवार यांनी डॉक्टर्स सेलने मदतकार्य करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार, पूरग्रस्त भागातील स्थानिक डॉक्टरांबरोबर समन्वय साधून सक्षम आपत्कालीन आरोग्य यंत्रणा राष्ट्रवादी डॉक्टर सेलने उभी केली आहे.
शंभर डॉक्टरांचे पथक आज जाणार
सांगली- कोल्हापूर भागातील परिस्थिती गंभीर असल्याने अजून 100 डॉक्टरांचे पथक मंगळवारी जाणार असल्याचे, डॉ. काळे यांनी सांगितले.