पूरग्रस्त भागातील एक गाव वैद्यकीयदृष्ट्या दत्तक घेणार

नगर – कोल्हापूर, सातारा, सांगली येथे महापुरामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यांना पुर्वपदावर येण्यासाठी सर्व समाजाने मदत केली पाहिजे . या भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. यासाठी केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशन व वैद्यकीय बांधव या भागामध्ये जावून आढावा घेणार आहे व त्या भागामध्ये कॅम्प लावून तेथील नागरिकांना आरोग्याची व आर्थिक मदत केली जाणार आहे.

प्रत्यक्ष त्या भागात गेल्यानंतर त्या भागातील नागरिकांना कशाची आवश्‍यकता आहे हे आपल्याला कळेल. यासाठी केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनने इदगाह मैदान येथे ईद निमित्त मुस्लीम बांधव नमाज पढण्यासाठी आले होते. त्यांनीही मोठ्या प्रमाणात आज माणुसकीच्या भावनेतून मोठ्या प्रमाणात मदत केली आहे, असे प्रतिपादन अध्यक्ष दत्ता गाडळकर यांनी केले.

कोल्हापूर, सातारा, सांगली येथील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशन व वैद्यकीय बांधव एकत्र येवून ईदगाह मैदान येथे मदतीचे आवाहन केले होते. यावेळी अध्यक्ष दत्ता गाडळकर, बडीसाजनचे सेक्रेटरी विशाल शेटीया, असो.चे जिल्ह्याचे माजी अध्यक्ष सुधीर लांडगे, राजेंद्र बेंद्रे, सुधाकर बोरुडे, मिलींद क्षीरसागर, मिरा मेडीकलचे हाजी फारुक शेख, सुभाष कांबळे, शहानवाज खान, मोसीन रॉयल, रमीझ शेख, मझहर शेख, नासिर काजी, शोएब शेख, फहीम अजीम, मुजमील सय्यद, मास्टर अपफान आदी उपस्थित होते.

हाजी फारुख शेख यावेळी म्हणाले, प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले पाहिजे. महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा आहे. सर्व जाती-धर्माचे लोक संकटाच्या काळात एकत्र येवून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करीत आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा येथे महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यांना मदतीचा हात देणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. यासाठी वैद्यकीय बांधव एकत्र येवून मोठा निधी गोळा करुन त्या भागातील नागरिकांना आरोग्यासाठीची मदत केली जाणार आहे. आज ईदगाह मैदान येथे मुस्लीम बांधवांनी मदतीचा हात दिला आहे. लवकरच वैद्यकीय बांधव पुरग्रस्त भागाला भेट देवून त्या भागातील एक गाव दत्तक घेणार आहे. व त्या भागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी काम करणार आहे, असे ते म्हणाले. यावेळी मोठ्या प्रमाणात वैद्यकीय बांधव उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here