लॉस एंजेलिस – चीनच्या साईसाई झेंगने सॅन होजे टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळवित आश्चर्यजनक कामगिरी केली. तिने चौथ्या मानांकित एरिनी सॅबेलेन्कावर 6-3, 7-6 (7-3) असा खळबळजनक विजय नोंदवित हे यश संपादन केले. करिअरमधील तिने प्रथमच ही अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे.
झेंगने पासिंग शॉट्सचा बहारदार खेळ करीत पहिल्या सेटमध्ये सर्व्हिसब्रेक मिळविला. दुसऱ्या सेटमध्ये सॅबेलेन्काने सर्व्हिसवर नियंत्रण मिळविले होते. हा सेट टायब्रेकरपर्यंत रंगतदार झाला. टायब्रेकरमध्ये झेंगने फोरहॅंडच्या ताकदवान फटक्यांचा सुरेख खेळ केला. तिने टायब्रेकर 7-3 असा सहज घेत अजिंक्यपदावर मोहोर नोंदविली.
सामना संपल्यानंतर झेंगने सांगितले की, करिअरमधील पहिलेच विजेतेपद नेहमीच सुखकारक आणि प्रेरणादायी असते. या स्पर्धेतील अंतिम लढतीत सॅबेलेन्काला पराभूत केल्यामुळे मला अत्यानंद झाला आहे. सॅबेलेन्का ही अतिशय नामांकित खेळाडू आहे व तिच्याबद्दल मला खूप आदर आहे. येथील विजयामुळे भावी काळात ग्रॅंड स्लॅम स्पर्धांमध्ये अव्वन दर्जाचे यश मिळविण्याचा मी प्रयत्न करणार आहे.