आंदोलनाची दखल घेत बोलविली 8 ऑगस्ट रोजी बैठक
पुणे- तोलणारांना कामावर रुजू करावे, या मागणीसाठी मार्केट यार्डातील गुळ-भुसार विभागात मागील सात दिवसांपासून हमालांनी पुकारलेले बंद आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. पणनमंत्री प्रा.राम शिंदे यांनी आंदोलनाची दखल घेत तोलणार, तोलाईचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ, दि पुना मर्चंट्स चेंबरच्या पदाधिकाऱ्यांची येत्या गुरूवारी (दि.8) बैठक बोलविली आहे. या पार्श्वभूमीवर महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.
हमालांनी 29 जुलै पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले. तोलाईच्या प्रश्नावर सोमवारपर्यंत (दि.5) निर्णय न झाल्यास मंगळवारपासून (दि.6) ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला. तर, राज्यातील सर्व बाजार समित्यांमधील माथाडी कामगार बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय झाला होता. या पार्श्वभूमीवर दखल घेत हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पणनमंत्र्यांनी बैठक बोलविली आहे.