पुणे – तोलणारांना कामावर घ्यावे, यासाठी हमालांनी मार्केट यार्डातील गूळ-भुसार विभागात पुकारलेल्या बेमुदत बंदमुळे गेल्या पाच दिवसांत 25 कोटींचे व्यवहार ठप्प झाले आहेत. तर लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दी पूना मर्चंट चेंबरने दिली.
महाराष्ट्र राज्य हमाल, मापाडी महामंडळाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बेमुदत बंदमुळे मार्केटयार्डातील भुसार विभागात गेल्या 5 दिवसांपासून बाहेरून आलेल्या मालाच्या 300 पेक्षा जास्त गाड्या जागेवर उभा आहेत. यामधील 10 टक्के गाड्यातील माल खाली करण्यात आला आहे. तर दुसरीकडे या उलाढालीतून पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला मिळणारे उत्पन्नही बुडाले आहे. मार्केटयार्डातील गुळ-भुसार बाजारात 5 दिवसांच्या संपात बाजार समितीचे जवळपास 90 टक्के व्यवहार बंद होते. बाजार समितीच्या गुळ-भुसार बाजारात दररोज जवळपास 4 ते 5 कोटींची उलाढाल होते. या उलाढालीमधून बाजार समितीला दररोज सरासरी 2 ते 3 लाख महसुली उत्पन्न मिळते. मात्र, या 5 दिवसांत कोणतेच व्यवहार न झाल्याने बाजार समितीला दररोज मिळणारे 4 ते 6 लाखांचे उत्पन्न बुडल्यात जमा आहे.
सध्या पाऊस जोरात सुरू आहे. त्यामुळे हमालांनी मागील 5 दिवसांपासून पुकारलेल्या बंदमुळे मोठे नुकसान झाले आहे. बाजारातील व्यापार लवकर सुरळीत व्हावा. यासाठी बाजार समिती प्रशासन आणि राज्य सरकारने या प्रश्नात लवकर लक्ष घालावे. पणन संचालकांनी 2014 मध्ये काढलेला आदेश त्वरित लागू करावा.
– पोपटलाल ओस्तवाल, अध्यक्ष, दी पूना मर्चंट चेंबर