पिंपरी –“ऍसिड ऍटक’ हा शब्द कोणत्याही तरुणीस अथवा मुलीस घाबरविण्यासाठी पुरेसा ठरतो. याच धमकीचा वापर करत सांगवी येथे एका तरुणीला जबरदस्तीने घरी नेऊन विनयभंग आणि मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 15) दुपारी बारा वाजताच्या सुमारास जुनी सांगवी, जयमालानगर येथे घडली. 22 वर्षीय तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तेजस कमलाकर गायकवाड (वय 25, रा. जयमाला नगर, जुनी सांगवी) असे आरोपीचे नाव आहे.
सोमवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास पीडित तरुणीला आरोपी तेजस याने नाव विचारले व फोन नंबर मागितला. तसेच त्याच्या घरी येण्यास सांगितले. मात्र तरुणीने त्यास फोन नंबर देण्यास आणि घरी येण्यासही नकार दिला. यावेळी, चिडलेल्या तेजसने माझ्या जवळ ऍसिडची बाटली असल्याचे सांगत घरी न आल्यास अंगावर ऍसिड टाकण्याची धमकी तरुणीला दिली. त्यावेळी घबारलेली तरुणी ऍसिडच्या भीतीपोटी तेजसच्या घरी गेली. घरी गेल्यानंतर त्याने तरुणीसोबत अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केला. तसेच तिला काठीने मारहाण केली.