आमदार जगताप यांच्या हस्ते लोकार्पण : अत्याधुनिक यंत्रांमुळे गरीब रुग्णांना लाभ
पिंपरी – सांगवी येथील राज्य सरकारच्या औंध ऊरो जिल्हा रुग्णालयाकरिता आमदार लक्ष्मण जगताप यांच्या आमदार निधीतून 1 कोटी 10 लाखांची यंत्रसामुग्री व साहित्य खरेदी करण्यात आली आहे. आमदार जगताप यांच्या हस्ते गुरूवारी (दि. 18) लोकार्पण करण्यात आले. या यंत्रसामुग्रीमुळे रुग्णालयांत उपचारासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांना आणखी दर्जेदार उपचार मिळणे शक्य होणार आहे.
सांगवी येथील राज्य सरकारच्या औंध ऊरो जिल्हा रुग्णालयात पिंपरी-चिंचवडसोबतच पुणे शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्ण उपचारासाठी येत असतात. आमदार जगताप यांनी औंध ऊरो जिल्हा रुग्णालयासाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत 2 डायलिसिस मशीन, डायलिसिस विभागासाठी एक हजार लिटर क्षमेतेचा 1 आरओ प्लॅन्ट, 5 फंक्शन बेड आणि 2 व्हेंटिलेटर मशीन दिल्या आहेत. त्याचप्रमाणे 5 प्रिंटर आणि स्कॅनर, औषध भांडाराची उभारणी, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी प्रतिक्षालयाची उभारणी, महिलांसाठी स्वच्छतागृहाची उभारणी तसेच रेकॉर्डरूमची उभारणी करण्यात आली आहे.
यावेळी पुणे आरोग्य विभागाचे उपसंचालक नितीन बिलोलीकर, जिल्हा शल्यचिकित्सक अशोक नांदापूरकर, रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, हे रुग्णालय गोरगरीब रुग्णांसाठी वरदान आहे. रुग्णालय आणखी सक्षम करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या रुग्णालयांत दुर्धर आजारांवरही उपचार व्हावेत, हा हेतू आहे. तसेच रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांचीही चांगली सोय करण्याचा आमचा प्रयत्न आहे. रुग्णांनीही महागड्या रुग्णालयात जाऊन आपली आर्थिक लूट करून घेण्यापेक्षा औंध ऊरो जिल्हा रुग्णालयात उपचार करून घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले.