राजगुरूनगर न्यायालयाचे न्यायाधीश अंबळकर यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकले
राजगुरूनगर – खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवारी (दि. 19) निर्णय दिला जाणार आहे. राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायायलयात न्यायाधीश ए. एम. अंबळकर यांनी गुरुवारी (दि. 18) आज दोन्ही बाजूने म्हणणे ऐकून घेत शुक्रवारी मोहिते यांच्या अर्जावर निर्णय दिला जाणार असल्याचा निर्णय दिला.
चाकण हिंसाचार प्रकरणी खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अंबळकर यांच्यापुढे गुरुवारी सुनावणी झाली. यापूर्वी दि.12 जुलै रोजी सुनावणी झाली होती. त्यावेळी न्यायाधीशांनी पोलिसांचे म्हणणे एकूण घेण्यासाठी आजची तारीख दिली होती.
दरम्यान, मोहिते पाटील यांचे वकील ऍड. हर्षद निंबाळकर यांनी सक्षम बाजू मांडली, तर सरकारी पक्षाच्यावतीने अरुण ढमाले यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूने म्हणणे ऐकून घेत न्यायाधीश ए. एम. अंबळकर यांनी शुक्रवारपर्यंत निकाल राखून ठेवला आहे. या अटकपूर्व जामिनाच्या निकालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आजच्या सुनावणी दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या आवारात मोठी गर्दी केली होती. अनुचित प्रकार घडू नये यासाठी न्यायालयाच्या आवारात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.