पुरंदर खरीप बैठकीला मुहूर्त नाहीच!

आढावा न घेतल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या सुरू 
हंगाम बैठक होणार की नाही ?: शेतकऱ्यांचा सवाल

वाघापूर – खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला तरी पुरंदर तालुक्‍याची खरीप हंगाम बैठक घेतलीच गेली नाही. तर जिल्हा परिषदेने मागील आठवड्यात संपूर्ण जिल्ह्याच्या खरीप बैठकीच्या तारखा जाहीर केल्या. त्यापैकी काही तालुक्‍यात बैठका घेतल्या, परंतु पुरंदर तालुक्‍यात मात्र तारीख जाहीर करूनही अखेर आढावा घेतलाच गेला नाही. त्यामुळे खरीप आढावा बैठक यावर्षी होणार का? असा सवाल तालुक्‍यातील शेतकरी उपस्थित करीत आहेत.

खरीप हंगामात कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी काय उपाययोजना केल्या आहेत, खरीप हंगामात खतांचा साठा किती आहे, नवीन कोणत्या जातीचे बियाणे बाजारात उपलब्ध आहे, नवीन कृषी योजना कोणत्या आहेत याबाबत खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच आढावा घेतला जातो, परंतु यावर्षी हा आढावा घेतला गेला नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी नाईलाजास्तव पेरण्या सुरू केल्या आहेत.

दरवर्षी साधारणपणे मे-जून महिन्याच्या दरम्यान जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांमध्ये खरीप आढावा बैठका जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात येतात. या बैठकीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, विविध समित्यांचे सभापती, पंचायत समितीचे पदाधिकारी, अधिकारी, तालुक्‍यातील शेतकरी उपस्थित असतात. तसेच जिल्ह्यासाठी शासनाच्या वतीने कृषी विभागाच्या नवीन योजना, कृषीसाठी पतपुरवठा, खते, बी-बियाणे, औषधे याबाबत आढावा दिला जातो. खरीप हंगामात घेण्यात येणारी पिके, त्यावर उपाययोजना आदींचाही तपशील सांगितला जातो मात्र, पुरंदर तालुक्‍यातील शेतकरी यापासून वंचित राहिला आहे.

… म्हणून सोयीस्कर टाळले
लोकसभा निवडणुका असल्याने आचारसंहितेचे कारण सांगत यावर्षी जिल्हा प्रशासनाने बैठक घेण्याचे सोयीस्करपणे टाळले; परंतु खुद्द मुख्यमंत्र्यांनी निवडणुका संपताच आचारसंहिता शिथिल करून विकासकामे करण्यास परवानगी दिली. त्यानंतर तरी यावर्षीची खरीप आढावा बैठक होईल असे वाटले होते, परंतु यावर्षी खरीप हंगाम सुरू होवून शेतकऱ्यांनी बियाणे पेरण्यास सुरुवातही केली. तरीही तालुक्‍याची बैठक झाली नाही.

आजची बैठक अचानक रद्द
पुरंदर तालुक्‍यात गुरुवारी (दि. 18) बैठक घेण्यात येणार होती, परंतु ऐनवेळी रद्द केल्याचे सांगण्यात आले. एकंदरीतच शेतकऱ्यांनी या आढावा आणि नियोजन बैठकीवर अवलंबून न राहता जवळपास पेरण्या उरकून घेतल्या आहेत. त्यामुळे केवळ बैठकीच्या नावाखाली अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या दौऱ्यासाठी जनतेचा पैसा का खर्च करायचा? आढावा बैठक घेणे एवढ्या उशिरा आवश्‍यक आहे का? मे-जून महिना संपून जुलै महिना संपण्याच्या बेतात आहे. त्यामुळे एवढ्या उशिरा शेतकऱ्यांना प्रशासन काय सल्ले देणार? असे अनेक प्रश्‍न शेतकरी उपस्थित करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)