खेडमध्ये भात लावणीला वेग

पश्‍चिम भागात आतापर्यंत 573 मिमी पाऊस : सरासरी कायम
चतु:सूत्री पद्धतीने भात लागवड : रोपांच्या संख्येत लक्षणीय वाढ

पाईट – खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी भात लावणीस सुरुवात केली होती. आदिवासी भागात पाऊस बऱ्यापैकी पडत असल्याने भात उत्पादक भात लावण्या वेगात करीत आहे. 1 जून 2019 पासून आतापर्यंत या भागात 573 मिमी पाऊस पडला असल्याने पावसाने आपली सरासरीची लय कायम राखली आहे.

भात पिकाच्या संदर्भात कृषी विभागाने मोठ्या प्रमाणात जनजागृती करून भात रोपांच्या संख्येत लक्षणीय वाढ केली तर चतु:सूत्री पद्धतीने भात लागवड केल्यास उत्पादन खर्च कमी होऊन कमी कष्टात उत्पादन जास्त होते अशा प्रकारे मार्गदर्शन तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब मांदळे, व कृषी मंडलाधिकारी विजय पडवळ, कृषी सहायक नविनकुमार गुंडाळ यांनी केले होते, त्यामळे वांद्रे, तोरणे, आढे, विऱ्हाम भलवडी, आंभू, आंबोली, कोळीये, गडद या गावात चतु:सूत्री (चारसूत्री) भातलागवड पहावयास मिळते तर कृषी सहायक पी. एम. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुपे, कासारी, देवतोरणे, पाळू, टेकवडी, आहिरे पाईट या गावांमध्ये एसआरटी पद्धतीने भात लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे.

पावसाने सातत्य राखल्यामुळे भात रोपांचे नुकसान झाले नाही. अपेक्षेप्रमाणे भात रोपे आल्यामुळे यावर्षी भात खाचरांमध्ये पूर्णपणे लागवड होत असल्याने बळीराजा समाधानी आहे. मध्यंतरीच्या चार-पाच दिवसांच्या काळात पाऊस नसल्यामुळे भात लावणी रखडली होती. या काळात काही शेतकऱ्यांनी विद्युत मोटारी व इंजिनच्या सहाय्याने पाणी घेऊन भात लावणी केली. दरम्यान, यावर्षी लागवड कमी झाली आहे, त्यात निसर्गाने साथ दिली तरच वर्षभर अन्नधान्य पुरेल अथवा अन्नधान्याचा तुटवडा पडण्याची भीती या भागातील शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

ट्रॅक्‍टरच्या सहाय्याने चिखलणी
खेडच्या पश्‍चिम भागात शेतमजुरांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्याने शेतकरी आपआपसात गट करून शेतीची कामे करताना दिसून येतात. शेतमजुरांना प्रतिदिन 300 ते 350 रुपये देण्यास शेतकऱ्यांना परवडत नसल्याने गटागटाने शेती करणे फायद्याचे ठरले आहे. चिखलणी करण्यासाठी पारंपरिक पद्धतीऐवजी ट्रॅक्‍टरच्या सहाय्याने करणे पसंत केले.

दरवर्षीपेक्षा बटाटा लागवड कमी
कृषी विभागामार्फत भात व तेलवर्गीय भुईमूग या पिकासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये जागृती केल्यामुळे यावर्षी भात व भुईमूग पिकाचे क्षेत्र वाढले आहे. बेभरवाशी बटाटा पिकाकडे काही प्रमाणात शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असल्याने यंदा बटाटा पिकाची लागवड दरवर्षीपेक्षा कमी प्रमाणत झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)