प्रभास आणि श्रद्धा कपूरच्या “साहो’च्या टीझरमध्ये प्रभासला ऍक्शन सीन करताना त्याचे फॅन्स भलतेच एक्साईट झाले आहेत. सोशल मिडीयावर या टीझरला भरपूर लाईक मिळायला लागले आहेत. ऍक्शन लव्हर्स प्रेक्षकांना हा सिनेमा नक्की आवडेल, असा मालमसाला यामध्ये ठासून भरलेला आहे. याच “साहो’मधील 8 मिनिटांच्या एका सीनसाठी तब्बल 70 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत, अशी माहिती आता मिळते आहे. या ऍक्शन सीक्वेन्सचे शुटिंग आबुधाबीमध्ये झाले आहे.
एका सीनवर एवढा प्रचंड खर्च केल्यामुळे “साहो’ इतिहास निर्माण करेल, असे निर्मात्यांना वाटते आहे. प्रभासची “बाहुबली’ची इमेज कायम राखत त्याला ऍक्शन हिरोचा रोल एकदम फिट आहे. त्याच्या जोडीला श्रद्धा कपूरही पोलिसाच्या रोलमध्ये असेल. या दोघांव्यतिरिक्त जॅकी श्रॉफ, नील नितीन मुकेश, मंदिरा बेदी, चंकी पांडे, महेश मांजरेकर यासारख्या ऍक्टर्सची फौज “साहो’मध्ये असणार आहे. 15 ऑगस्टला रिलीज होणाऱ्या “साहो’ला हिंदीबरोबरच तमिळ आणि तेलगूमध्येही केले जाणार आहे. म्हणजे एकाचवेळी तिन्ही भाषांच्या प्रेक्षकांना “साहो’चा आनंद घेता येणार आहे.