ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बॅली यांची प्रमुख उपस्थिती
पणजी – इफ्फीत यंदा रशिया भागीदार होण्याची शक्यता असून, सात मोठ्या शहरांमध्ये रोड शो’ करण्यात येईल. यंदा इफ्फीत विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय माहिती तथा प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. तसेच या सुवर्ण महोत्सवी वर्षी ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बॅली यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
इफ्फीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सुकाणू समितीची बैठक आज गोव्यात पार पडली. त्यानंतर केंद्रीय माहिती तथा प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. या बैठकीस गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मधुर भांडारकर, राहुल रावल, ए. के. बीर आदी उपस्थित होते.
जावडेकर म्हणाले, यंदा दि. 20 ते दि. 28 नोव्हेंबर असे नऊ दिवस इफ्फी चालणार आहे. इफ्फीचे यंदाचे 50वे वर्ष असल्याने विशेष उपक्रमांचे आयोजन आहे. इफ्फी यशस्वी करण्यासाठी देशातील सात मोठया शहरांमध्ये “रोड शो’ करण्यात येईल. बिझनेस प्रदर्शनही असेल, जे फिल्म क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती देईल.
यंदाच्या महोत्सवाला हजेरी लावण्यास ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बॅली यांनी होकार दर्शविला आहे. इफ्फीत सहभागी होणा-या अनेक आंतरराष्ट्रीय व्यक्तींमध्ये त्यांचे खास आकर्षण राहणार आहे. त्यांच्या सहभागामुळे या महोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व प्राप्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यंदाच्या इफ्फीचे आणखी वैशिष्टय म्हणजे विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. सुकाणू समितीवर बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, सिद्धार्थ राय-कपूर, फिरोज अब्बास खान, सुभाष घई आदी मान्यवरांनी सहभाग घेण्याचे निश्चित केले आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील फिल्म क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहतील.
पुरस्कारांबद्दल ते म्हणाले की सुवर्ण मयूरसाठी 40 लाख, रौप्य मयूरसाठी 10 लाख तसेच उत्कृष्ट निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री आदींसाठी प्रत्येकी दहा लाख असे पुरस्कार असतील.