भाजप कार्यकारी अध्यक्ष नड्डा यांच्या उपस्थितीत प्रवेश
नवी दिल्ली – गोव्यातील काँग्रेसचे माजी विरोधी पक्ष नेते चंद्रकांत कवलेकर यांच्यासह काँग्रेसच्या १० आमदारांनी आज नवी दिल्ली येथे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा व गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
तत्पूर्वी काल काँग्रेसचे जेष्ठ नेते चंद्रकांत कवलेकर यांच्यासह १० आमदारांनी भाजपमध्ये विलीन होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. याच पार्श्वभूमीवर आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सदर १० काँग्रेस आमदारांसह दिल्ली गाठत पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याशी आमदारांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा केली. सदर चर्चेनंतर या आमदारांचा अधिकृतरीत्या भाजपमध्ये प्रवेश झाला आहे.
४० संख्याबळ असणाऱ्या गोवा विधानसभेमध्ये काँग्रेसचे सर्वाधिक १५ आमदार होते मात्र आता १० आमदारांनी पक्षाकडे पाठ फिरविल्याने हे काँग्रेसचे गोव्यामध्ये आता केवळ ५ आमदार उरले आहेत. गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा जिंकल्यानंतरही काँग्रेसला सत्तास्थापनेसाठीचा जादुई आकडा गाठता आला नव्हता.
Delhi: 10 Congress MLAs from Goa join BJP in presence of BJP Working President JP Nadda & Goa CM Pramod Sawant. pic.twitter.com/VFVxKrymrT
— ANI (@ANI) July 11, 2019