लंडन – वेगवान गोलंदाजांचा भेदक मारा या प्रभावी अस्त्राचा उपयोग करीत यापुर्वी दोन वेळा वेस्टइंडीज संघाने विश्वचषक जिंकला होता. त्याची झलक यंदा पहिल्या सामन्यात त्यांनी पाकिस्तानचा धुव्वा उडविताना दिली होती. बलाढ्य ऑस्ट्रेलियाची त्यांच्यापुढे कसोटीच ठरणार आहे. या दोन संघांमध्ये नाॅटिगंम येथे गुरवारी दुपारी 3 वाजता सामना होणार असुन त्याबाबत उत्कंठा निर्माण झाली आहे.
वेस्टइंडीजने दोन वेळा विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. 1975 मध्ये पहिल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्यांनी ऑस्ट्रेलियावर मात केली होती, त्यावेळी वेस्टइंडिजच्या विजयात चार द्रुतगती गोलंदाजांनी मोठा वाटा उचलला होता. पुन्हा चार वर्षानंतर विडीज संघाने वेगवान गोलंदाजांच्या जोरावर त्यांनी विश्वचषकावर आपले नांव कोरले. यंदा पुन्हा वेगवान गोलंदाजांवर त्यांची भिस्त आहे. पाकिस्तानचा केवळ 105 धावांमध्ये खुर्दा उडविताना त्यांनी मोठा वाटा उचलला होता. उसळत्या चेंडुचा मारा करीत त्यांनी पाकिस्तानच्या अनुभवी फलंदाजांना रोखुन धरण्यात यश मिळविले होते. त्यांच्या ओशेनी थॉमस याने 27 धावांमध्ये चार गडी बाद करीत सिंहाचा वाटा उचलला होता. त्याला आंद्रे रसेल, शेल्डॉन कोटरील व कर्णधार जेसन होल्डर यांचीही चांगली साथ लाभली होती.
केमार रोच व शेनॉन गॅब्रियल यांच्या अनुपस्थितीतही विडींजचा मारा प्रभावी ठरला आहे. विडीजकडे वेगवान गोलंदाजांची कमतरता नाही हे सिध्द झाले आहे. विजेतेपद राखण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानला सात गडी राखुन हरवित शानदार सलामी केली आहे. चेंडु कुरतडण्याच्या आरोपामुळे एक वर्षाच्या बंदीनंतर डेव्हिड वॉर्नर व स्टीव्ह स्मिथ यांचे ऑस्ट्रेलियन संघात पुनरागमन झाले आहे, ही त्यांच्यासाठी जमेची बाजु आहे. हे दोन्ही फलंदाज उसळत्या चेंडुवर फटकेबाजी करण्याबाबत माहीर आहेत.
ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार स्टीव्ह वॉ यांनी विडीजच्या गोलंदाजीचे कोतुक केले असुन आपल्या संघातील खेळाडुंनी आत्मविश्बासाने खेळण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, यंदा सहभागी झालेल्या सर्व संघांमध्ये अव्वल यश मिळविण्याची क्षमता आहे. आमच्या खेळाडुंनी जबाबदारीने खेळण्याची गरज आहे. विडींजकडे आक्रमक फलंदाज आहेत हे विसरुन चालणार नाही. ख्रिस गेल हा धोकादायक फलंदाज आहे. पहिल्याच सामन्यात त्याने त्याची झलक दाखविली आहे. तसेच त्यांच्याकडे शेवटच्या फळीत फटकेबाजी करणारे खेळाडु आहेत हे विसरुन चालणार नाही. अचुक टप्पा व दिशा ठेवीत गोलंदाजी करणे हेच सुत्र आमच्या गोलंदाजांनी आत्मसात करण्याची आवश्यकता आहे.
प्रतिस्पर्धी संघ –
ऑस्ट्रेलिया –
ऍरोन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, जेसन बेहनड्रॉफ, अलेक्स केरी (यष्टीरक्षक), नॅथन कोल्टिअर नील, पॅट कमिन्स, नॅथन लायन, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोईनिस, ऍडम झंपा.
वेस्ट इंडिज –
जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, फॅबिअन ऍलन, कार्लोस ब्रेथवेट, डॅरेन ब्राव्हो, शेल्डॉन कॉट्रेल, शॅनन गॅब्रिएल, शिमोरन हेटमेयर, शाय होप, एल्विन लुईस, अशले नर्स, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), केमार रोच, आंद्रे रसेल, ओशाने थॉमस.