पुणे, आकुर्डीतील कार्यालय आता “एचए’च्या जागेत
पिंपरी – पिंपरी येथील हिंदुस्थान ऍण्टीबायोटिक्स (एचए) कंपनीच्या जागेत पुण्यातील गोळीबार मैदान येथील पीएफचे विभागीय कार्यालय स्थलांतरित होणार आहे. याशिवाय पुणे क्षेत्रिय आणि आकुर्डीतील क्षेत्रीय कार्यालयांचे देखील पिंपरीत स्थलांतर होणार आहे.
एचए कंपनीच्या प्लॉट नंबर पी 6 या साडेतीन एकर जागेत हे पीएफ कार्यालय होणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला पीएफ एक्झेक्युटीव्ह समितीने मान्यता दिली. पीएफ कार्यालय शहरात होणार असल्याने कामगारांना दिलासा मिळणार आहे. 1991 पासून पुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या जागेत पुणे विभागाचे तर आकुर्डी गावठाणात सन 2008-09 दरम्यान आकुर्डी क्षेत्रीय कार्यालयाचे कामकाज कार्यान्वित आहेत. सात ते आठ लाख रुपये भाडेतत्वार ही कार्यालये सुरु आहेत. दोन्ही क्षेत्रीय कार्यालये मिळून चारशे कर्मचारी कार्यरत आहेत. नागरिक आणि कर्मचारी दोघांच्या दृष्टीने पीएफचे कामकाज अधिक गतीमान व्हावे. याकरिता एकाच जागेत पीएफची कार्यालये असावीत.
यासाठी पीएफच्या महाराष्ट्र झोनल ऑफीसचे ऍडिशनल कमिशनर सत्यनारायण यांनी विशेष प्रयत्न केले. या कार्यालयाकडून स्वत:च्या मालकीच्या जागेसाठी प्रयत्न सुरु होते. त्यासाठी लेबर मिनिस्ट्री अंतर्गत कार्यरत पीएफ एक्झुक्युटीव्ह कमिटीकडे मागणी केली होती. त्यानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात जागेचा शोध सुरु होता. पिंपरीतील एच.ए. कंपनीने त्यांची साडेतीन एकर जागा देण्यास सहमती दर्शविली. 20 मे रोजी पीएफ एक्झुक्युटिव्ह कमिटीची दिल्ली येथे झालेल्या बैठकीत एच.ए. कंपनीच्या साडेतीन एकर जागेवर कार्यालय करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.