प्रभासचा “साहो’ 15 ऑगस्टल रिलीज होणार असे निर्मात्यांनी जेंव्हा जाहीर केले, तेंव्हा याच दिवशी रिलीज होणाऱ्या “बाटला हाऊस’ आणि “मिशन मंगल’च्या रिलीज डेटमध्ये काही तरी फेरबदल होणार असा अंदाज आला होता. त्याप्रमाणे आता “मिशन मंगल’ची रिलीज डेट बदलल्याची बातमी पुढे आली आहे. प्रभासच्या सिनेमाशी टक्कर घेण्यापेक्षा “मिशन मंगल’ एक आठवडा आगोदरच रिलीज करायचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.
आता “मिशन मंगल’ 9 ऑगस्टला रिलीज होणार आहे. हा निर्णय अगदी योग्य आहे. कारण आता “साहो’शी कोणतीही स्पर्धा होण्याचा प्रश्नच नाही. “मिशन मंगल’मध्ये अक्षय कुमारबरोबर विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, कीर्ती कुल्हारी आणि शरमन जोशी असणार आहेत. जरी हा अक्षयचा सिनेमा आहे, असे म्हटले जात असले तरी त्यामध्ये अक्षयचा रोल फार मोठा नाही. स्वतः अक्षयनेच ही बाब यापूर्वीच स्पष्ट केली आहे. “नाम शबाना’मध्ये ज्या प्रमाणे अक्षयचा रोल अखेरच्या टप्प्यात आणि अगदी महत्वाच्या सीनमध्ये होता, त्याच प्रमाणे “मिशन मंगल’मध्येही केवळ 20-25 मिनिटांचाच त्याचा रोल असणार आहे.