पिंपरी – कामातून मिळालेले पैसे एकाकडे ठेवण्यासाठी दिल्यानंतर तो परत करत नसल्याने युवकाने त्याच्या घरासमोरच जाळून घेवून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना शुक्रवार दि. 17 मे रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आकुर्डी येथील दुर्गानगर झोपडपट्टी येथे घडली.
संदीप बैसाने (वय-28 रा. बामणे ता. सिंदखेडा जि. धुळे) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ सतिश बैसाने (वय-36) याने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन मंगल बापू अव्हाड (वय-38 रा. दुर्गानगर झोपडपट्टी, आकुर्डी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी लागलीच त्याला अटकही केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहीती अशी की, फिर्यादी यांचा भाऊ संदीप हा कामासाठी पिंपरी-चिंचवड शहरात आला होता. त्याला कामातून मिळालेले पैसे त्यांने मंगल अव्हाड यांच्याकडे दिले होते. त्यानंतर संदीप याला पैशाची गरज पडल्यानंतर त्याने ते पैसे आव्हाड यांना परत मागीतले असता त्यांनी ते पैसे दिले नाहीत. अनेक वेळा पैशाची मागणी करुनही ते परत मिळत नसल्याने, वैतागलेल्या संदीप याने शुक्रवार दि. 17 ते रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मंगल अव्हाड यांच्या घरासमोरच अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेवून आत्महत्या केली. या बाबत निगडी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास निगडी पोलीस करीत आहेत.