चंदीगड – अभिनेता व भाजपचा गुरूदासपुर मतदार संघातील उमेदवार सनी देओल यांना निवडणूक आयोगाने आचार संहिता भंगाची नोटीस जारी केली आहे. प्रचाराची मुदत संपल्यानंतरही सनी यांनी शुक्रवारी रात्री पठाणकोट येथे एक जाहींर सभा घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
सुमारे दोनशे लोकांच्या उपस्थितीत ही प्रचार सभा झाली होती व त्यासाठी तेथे लाऊडस्पीकरचाही वापर करण्यात आला होता. हा आचार संहिता भंगाचा प्रकार असल्याची तक्रार त्यांच्या विरोधात नोंदवण्यात आली आहे. या मतदार संघात रविवारी शेवटच्या टप्प्यात मतदान होत असून येथे सनी देओल यांची लढत कॉंग्रेसचे सुनिल जाखड यांच्याशी होत आहे. सनी देओल यांनी निवडणुकीच्या तोंडावरच भाजपमध्ये प्रवेश करून आपली राजकीय इनिंग सुरू केली आहे.