मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनामुळे दिल्लीकरांना दिलासा
नवी दिल्ली: नवी दिल्ली एनसीआरमध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाने दमदार एन्ट्री केली आहे. यामुळे गेले काही दिवस उकाड्याने हैराण झालेल्या दिल्लीकरांना दिलासा मिळाला. तसेच येत्या 48 तासांत उत्तरेकडील राज्यांमध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, वातावरणातील या बदलांचा पश्चिमेकडील किनारपट्टीला फटका बसण्याची शक्यता आहे.
बुधवारी सकाळपासूनच दिल्ली व त्यालगतच्या राज्यांमधील हवामानात अचानक बदल झाला. सकाळी 7 च्या सुमारास वादळीवाऱ्यास सुरुवात झाली. त्यानंतर काही क्षणातच काळे ढग जमा झाले आणि बघता बघता मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली. पण तासाभराच्या आतच मध्यम स्वरूपाच्या पावसाने मुसळधार पावसाचे रुप धारण करत दिल्लीकरांची पुरती दाणादाण उडवली. यावेळी कामावर निघालेल्या दिल्लीकरांना पावसापासून बचाव करण्यासाठी आडोशाचा आधार घ्यावा लागला.
तर येत्या काही तासात दिल्लीला लागून असलेल्या हरियाणा, हिसार, जींद, रोहतक, कॅथल, गोहना, पानिपत, करनाल, सोनीपत आणि गुरूग्राम येथेही हवामान बदलण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दुसरीकडे छत्तीसगढ, तेलंगणा, तमिळनाडू आणि पुद्दचेरी येथे अजून 4 ते 5 दिवस उकाडा कायम राहील.
महाद्विपांच्या उत्तरेकडील भागात येणाऱ्या वादळामुळेच उत्तर व पश्चिम हिंदुस्थानातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. यामुळेच मैदानी व डोंगराळ भागातील हवामानही बदलत आहे. याचा परिणाम राजस्थानपासून पंजाब, हरियाणा, जम्मू-कश्मीरमध्येही बघायला मिळणार आहे.