लंडन – “ब्रेक्झिट’बाबत ब्रिटनच्या संसदेमध्ये यापूर्वी फेटाळण्यात आलेला प्रस्ताव जून महिन्यात पुन्हा एकदा संसदेच्या मंजूरीसाठी मांडण्याची तयारी पंतप्रधान थेरेसा मे यांनी केली आहे. हा प्रस्ताव संसदेच्या संमतीसाठी चौथ्यांदा मांडण्यात येणार आहे. त्यासाठी युरोपियन संघातून ब्रिटनने बाहेर पडण्याच्या हेतूने एकमत निर्माण होण्याच्या उद्देशाने सर्व पक्षांशी चर्चेला एक मुदत मिळाली आहे. “विदड्रॉवल ऍग्रीमेंट बिल’ नाव असलेले हे विधेयक 3 जूनरोजी सुरू होणाऱ्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहामध्ये मांडण्यात येणार आहे. या विधेयकाद्वारे 28 देश सदस्य असलेल्या युरोपिय संघातून ब्रिटनने 31 ऑक्टोबरच्या मुदतीत बाहेर पडणे शक्य होणार आहे.
“ब्रेक्झिट’बाबतची कटिबद्धता स्पष्ट करण्यासाठी थेरेसा मे यांनी विरोधी पक्ष नेते जेरेमी कॉर्बिअ यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. युरोपिय संघातून बाहेर पडण्याबाबत घेण्यात आलेल्या सार्वमताच्या निष्कर्शाबाबत त्यांनी चर्चा केली. संसदेच्या उन्हाळी काळातील सुटीपूर्वी युरोपिय संघातून ब्रिटनने बाहेर पडावे यासाठी ही चर्चा आवश्यक आहे, असे सरकारी प्रवक्त्याने सांगितले.
विरोधी मजूर पक्षाच्या सदस्यांबरोबर या संदर्भात सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. “ब्र्रेक्झिट’संदर्भात गेल्या वर्षापासून ब्रिटनच्या संसदेमध्ये दोन तट पडले आहेत. त्यात सत्ताधारी हुजूर पक्षातील सदस्यांनीही थेरेसा मे यांच्या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे.