कोठडी संपल्यानंतर माफी मागण्याचे आदेश
नवी दिल्ली -पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर शेअर केल्याप्रकरणी भाजप कार्यकर्ता प्रियांका शर्माना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
मेट गाला या फॅशन शोमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राने केलेल्या विचित्र मेकअप फोटोवर ममता बॅनर्जींचा चेहरा लावण्यात आला होता. याप्रकरणी बंगाल सरकारने प्रियांका शर्माला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. यानंतर प्रियांका शर्माची न्यायालयीन कोठडीतून सुटका झाल्यानंतर तिने ममता बॅनर्जीची माफी मागावी, असे न्यायालयाने सांगितले आहे.
अमेरिकेत पार पडलेल्या मेट गाला या फॅशन शोमध्ये बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने विचित्र मेकअप केला होता. त्यामुळे सोशल मीडियावर तिला नेटीझन्सने ट्रोल केले गेले होते.
मेट गालामधील प्रियांका चोप्राच्या फोटोचे विविध प्रकारचे मिम्स भारतात सोशल मीडियावर शेअर केले जाऊ लागले. तृणमूल कॉंग्रेसचे नेता विभास हाजरा यांनी दिलेल्या तक्रारीनंतर प्रियांका शर्मा यांना अटक करण्यात आली होती. माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत 10 मे रोजी ही अटक करण्यात आली होती.