श्रीनगर -जम्मू-काश्मीरमध्ये सोमवारी पोलिसांनी एका दहशतवाद्याला अटक केली. तो पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद या संघटनेचा सदस्य असल्याचे स्पष्ट झाले. हिलाल अहमद असे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. त्याला दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात पकडण्यात आले. त्याच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्याचा साठाही जप्त करण्यात आला.
जम्मू-काश्मीरच्या पुलवामात फेब्रुवारीमध्ये जैशने भयंकर दहशतवादी हल्ला घडवला होता. तेव्हापासून सुरक्षा दलांनी जैशच्या विरोधात आणखीच आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. त्यापार्श्वभूमीवर, जैशच्या दहशतवाद्याला अटक केल्या जाण्याच्या घटनेला महत्व आहे.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील स्वतंत्र घटनेत पोलिसांनी दहशतवादी असल्याच्या संशयावरून दोघांना पकडले. जम्मू विभागातील रामबन जिल्ह्यात ती कारवाई करण्यात आली. संशयितांची कसून चौकशी केली जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली.