शेवटच्या क्षणी गौरवने केला आईचा धावा; सैतानी कृत्याने जिल्ह्यात संतापाची लाट
वेलडन वाई पोलीस
तपासाच्या बाबतीत कोणतेही दुवे हाती नसताना, ज्या नात्यावर शंका घेणे सुध्दा भीतीचे ठरले असते, त्या आईलाच अत्यंत कौशल्याने तपास करून वाई पोलिसांनी जेरबंद केले. वाई पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. याप्रकरणी वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे व सहकारी पोलीस हवालदार कृष्णा पवार, पोलीस नाईक शिवाजी जाधव, पोलीस कॉन्स्टेबल ओंकार गरुड, सोमनाथ बल्लाळ, साहाय्यक फौजदार त्र्यंबक आहिरेकर यांनी कामगिरी केली.
प्रशांत जाधव
सातारा – आई म्हणजे ईश्वराचा आवाज, अंतरात्मा, जगातील सर्व चुका माफ करणारे न्यायालय अशा एक ना अनेक विशेषणांनी आईला गौरवले जाते. पण याच सगळ्या विशेषणांना काळीमा फासण्याचे काम दक्षिण काशी म्हणून लौकिक असलेल्या वाईत चक्क एका आईनेच केले. अनैतिक संबंधाला अडसर ठरणाऱ्या पोटच्या पोराला वाहत्या कॅनॉलमध्ये ढकलण्याचे पाप केले. कॅनॉलमध्ये पडलेलेल्या त्या चिमुकल्याला आईच आपली वैरी झाल्याची जाण नसल्याने, जीवाच्या आकांतांने तो आईचा धावा करत होता. पण अनैतिक संबंधाच्या आहारी गेलेल्या निर्दयी मातेला पोराच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या आक्रोशाने पाझर फुटलाच नाही. संशयित अश्विनी प्रकाश चव्हाण हिने पोलिसांना दिलेल्या माहितीमुळे पोलीसही काही काळ चक्रावून गेले होते.
याबाबत माहिती अशी की, पोटचा गोळाच अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने जन्मदात्या आईनेच गौरव प्रकाश चव्हाण (वय 10) याचा प्रियकराच्या मदतीने कट रचून कॅनॉलमध्ये ढकलून देत खून केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघड झाली. याप्रकरणी संबंधित महिला अश्विनी प्रकाश चव्हाण (वय 29, रा. वृंदावन कॉलनी, नावेचीवाडी, वाई) व तिचा प्रियकर सचिन शिवराम कुंभार (वय 41, रा. बावधन) दोघांनाही अटक करण्यात आली आहे. अटकेतील अश्विनी हिने पोलिसांना दिलेल्या माहितीमुळे ती अनैतिक संबंधाच्या घाणीत खोलवर बुडाल्याचे स्पष्ट होते. या दोघांच्या सैतानालाही लाज वाटेल अशा कृत्याने जिल्ह्यात त्यांच्याविरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे.
मृत गौरव चव्हाण हा दि. 28 एप्रिल रोजी रात्री दहा वाजता गंगापुरी येथून बेपत्ता झाल्याची फिर्याद त्याची आई अश्विनी हिनेच वाई पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानंतर दि. 29 एप्रिल रोजी दुपारी 4 वा. देगाव हद्दीत धोम डाव्या कालव्यात गौरवचा मृतदेह मिळून आला.
दरम्यान, गौरवच्या तोंडाला फेस सदृश काही तरी दिसल्याने वाई पोलिसांनी घातपाताच्या संशयावरून तपासाची चक्रे गतिमान केली होती. तपासात अश्विनी हिच्या बोलण्यात व स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीत पोलिसांना विसंगती जाणवू लागल्यानंतर पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी तिला विश्वासात घेऊन चौकशी करण्यास सुरुवात केली. पहिल्यांदा पोलिसांची सहानुभूती मिळावी म्हणून पोलिसांनाच मातृत्वाचे धडे शिकवणाऱ्या अश्विनी हिने पोलिसी खाक्या दाखवताच प्रियकर सचिन कुंभारच्या मदतीनेच आपण गौरवचा खून केल्याची धक्कादायक कबुली दिली. त्यानंतर तिने खुनाचे कारण सांगताच खाकीलाही काही काळ घाम फुटला होता. गेल्या दोन वर्षांपासून सचिन सोबत तिचे अनैतिक संबंध होते. त्या संबंधाला गौरव हा अडसर ठरत असल्यामुळे त्याचा कायमचा काटा काढायचा प्लॅन दोघांनी केला होता.
त्यानुसार घटनेच्या अगोदर दोन दिवस अश्विनी संधीच्या शोधात असल्याने कामावर गेलीच नव्हती. अखेर दि.28 रोजी गंगापुरी येथे लावणीचा कार्यक्रम असल्याने नेमका त्याच दिवशी गौरवचा काटा काढण्याचा प्लॅन त्या दोघात ठरलाच. घटनेच्या दिवशी अश्विनी गौरवला लावणी पाहण्यासाठी घेऊन गेली होती. लावणीचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर अश्विनी ही सचिनच्या सांगण्यावरून स्वत:च्या दुचाकीवरून गौरवला घेवून शाहीर चौकात गेली. त्याठिकाणी पोहोचल्यावर सचिनने गौरवला गुंगीचे अथवा तत्सम औषध मिश्रीत कोल्ड्रिंक्स प्यायला दिले. त्यानंतर बेशुध्द गौरवला घेवून ते दोघे सचिनच्या दुचाकीवर बसून एमआयडीसीच्या दिशेने गेले. त्यानंतर गौरवला कॅनॉलमध्ये ढकलून दिले. दरम्यान आपण पाण्यात पडल्याचे गौरवला कळताच त्याने जिवाच्या आकांताने आईला आवाज देण्यास सुरुवात केली. मात्र अनैतिकतेच्या आहारी गेलेल्या त्या आईला पाझर फुटलाच नाही.