दुष्काळासाठी एक रुपयाची मदत केली नसल्याने मतदारांची नाराजी
रामराजेंच्या राजकीय प्रेमाची चर्चा
राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या दहिवडी येथे प्रचार सभेत नेते रामराजे निंबाळकर यांनी मी तुमच्या मदतीला अर्ध्या रात्री धावून येणार असे आश्वासन दिले होते. मात्र दुष्काळ पाहायलासुद्धा ते आले नाहीत. नुसते वरचे प्रेम रामराजे निंबाळकर यांचे माण तालुक्यावर असल्याचे दिसून येते.
बिदाल – सध्या माण तालुक्यात भीषण दुष्काळ सुरू आहे. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी उमेदवार संजय शिंदे तर भाजपचे रणजित निंबाळकर फक्त खासदार होण्यासाठी माण तालुक्यात मतदारसंघात प्रचार केला. लोकसभाच्या मतदानानंतर माण तालुक्यातील पाणी फाउंडेशनच्या चळवळीला व जनावरांना चारा पाण्यासाठी कोणतीही आर्थिक मदत न केल्याने रणजित निंबाळकर व संजय शिंदे यांच्याविषयी लोकामध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.
नुकत्याच पार पडलेल्या बहुचर्चित माढा लोकसभा पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराच्या सारी पाटावर विधानसभेच्या सोंगट्या टाकून राष्ट्रीय कॉंग्रेस, भाजपा व सेना यांनी ऐन प्रचाराच्या धामधुमीत माण खटाव तालुक्यात भक्कम असलेल्या राष्ट्रवादीला शस्त्रहिन करण्यासाठी आघाडी धर्माचे पावित्र्य माण गंगा नदीच्या कोरड्या वाळूत गाडून कॉंग्रेसचे जयकुमार गोरे यांनी माढ्यात भाजपाचा प्रचार भाजपाच्या स्टेजवर न जाता मित्रत्वाच्या नात्याने खुलेपणाने करून त्याच्या समर्थकांनाही दोन्ही तालुक्यात नुकतेच बीजरोपण झालेल्या भाजपाचे कमळ फुलवायचा आदेश दिला. राष्ट्रवादीचे नेते शेखरभाऊ गोरे यांच्यावर होत असलेल्या अन्यायाला राष्ट्रवादीची वरिष्ठ मंडळी न्याय देत नसल्याचे कारण देत लोकसभेला राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विरोधात दंड थोपटून भाजपाच्या उमेदवारास बाहेरुन पाठिंबा देवून प्रचाराचे रान उठवले. गेली अनेक वर्षे एकमेकांची तोंडेही न पहाणारे दोन्ही गोरे बंधुंनी पदरमोड करुन भाजपाच्या प्रचाराचे रान उठवल्याने तर गोरे बंधू व भाजपाचे नेते एकमेकांवर तोंड सुख घेणारे एका स्टेजवर भाजपचा प्रचार करताना दिसत असल्याने तालुकाचे चित्र नेते मंडळी भाजपच्या गोट्यात तर मतदार राजा संभ्रमावस्थेत राहिल्याने लोकसभेला मताची टक्केवारी पुरती ढासळून गेल्याने हा मताचा घसरलेला टक्का आ. गोरे यांच्या की शेखरभाऊ यांच्या पथ्यावर पडणार की राष्ट्रवादी पक्षाच्या पडणार हे निकालानंतर दिसणार आहे.
लोकसभेच्या प्रचारात विधानसभेची गणिते आ. गोरे, शेखर गोरे, डॉ. दिलीप येळगावकर, अनिल देसाई व रणजितसिंह देशमुख गत विधानसभेला एकमेकांच्या विरोधात हे पाच पांडव उभे होते. तर खटावमधील माजी आ. प्रभाकर घार्गे व माणच्या राजकारणात नव्याने आलेले सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख या राष्ट्रवादीच्या दोघांना या पाच पांडवाबरोबर लोकसभेची लढत देत राष्ट्रवादी मताधिक्य देण्याचे सोडा दोन्ही तालुक्यात समान टक्केवारी करण्याचा प्रयत्न घार्गे, देशमुख, कॉंग्रेसचे खटाव तालुकाध्यक्ष देशमुख, माणचे अध्यक्ष एम. के. भोसले, राष्ट्रवादीचे बाळासाहेब सावंत मोजक्या शिलेदारांच्यावर राष्ट्रवादीच्या प्रचाराची धुरा होती . माढा मतदारसंघातून शरद पवार व विजयसिंह मोहिते खासदार झाले. मात्र माण तालुक्याचा पाणी प्रश्न संसदेत मांडला नाही. आता संजय शिंदे आणि रणजित निंबाळकर यांच्यातील कोणताही खासदार झाला तरी माणचा पाणी प्रश्न संसदेत उपस्थित करणार नाहीत.